टर्कीच्या पूर्वेकडील मालट्या प्रांतात सोमवारी ५.६ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला आहे. या भूकंपाने परिसरातील काही इमारती जमीनदोस्त झाल्या आहेत. यामध्ये आतापर्यंत एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून ६९ लोक जमखी झाल्याची माहिती मिळत आहे. याबाबतचं वृत्त ‘अनाडोलू’ वृत्तसंस्थेनं दिलं आहे.
विशेष म्हणजे तीन आठवड्यांपूर्वी टर्की आणि सीरीया देशाच्या सीमेवर शक्तिशाली भूकंप झाला आहे. या भूकंपात मोठी जिवीतहानी झाली असून अनेक इमारती जमीनदोस्त झाल्या आहेत. त्यानंतर आज पुन्हा ५.६ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाने देश हादरला आहे. देशाच्या आपत्ती व्यवस्थापन एजन्सीने सांगितलं की, सोमवारी झालेल्या भूकंपाचं केंद्रबिंदू मालट्या प्रांतातील येसिल्तार शहरात होता. याबाबतचं वृत्त ‘एएनआय’ने दिलं आहे.
या भूकंपात अनेक घरं कोसळली असून यामध्ये एकाचा मृत्यू झाला आहे. तर ६९ लोक जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. मृत आणि जखमींची संख्या आणखी वाढू शकते, अशी भीती स्थानिक अधिकाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. बचाव कार्य सुरू आहे.