आज रात्री साडे नऊच्या सुमारास भारताची राजधानी दिल्लीसह जम्मू-काश्मीर, अफगाणिस्तान आणि पाकिस्तानच्या सीमेवर भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. हा भूकंप ५.८ रिश्टर स्केल तीव्रतेचा असल्याची माहिती राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राकडून देण्यात आली आहे. या घटनेत पडझड झाल्याची अथवा जीवितहानी झाल्याची कोणतीही माहिती अद्याप समोर आली नाही.
राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राने (एनसीएस) दिलेल्या माहितीनुसार, या भूकंपाचा केंद्रबिंदू अफगाणिस्तानमधील हिंदूकुश प्रदेशात होता. हे ठिकाण जम्मू आणि काश्मीरमधील गुलमार्ग जिल्ह्याच्या वायव्येस ४१८ किलोमीटर अंतरावर आहे.
एनसीएसच्या माहितीनुसार, हा भूकंप शनिवारी रात्री ९ वाजून ३१ मिनिटांनी झाला. या भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीच्या खाली सुमारे १८१ किलोमीटर खोल होता.
राजधानी दिल्लीसह आसपासच्या परिसरात भूकंपाच्या धक्के जाणवल्यानंतर दिल्ली पोलिसांनी ट्वीट केलं आहे. “आशा आहे की तुम्ही सर्वजण सुरक्षित आहात. काही आपत्कालीन मदत हवी असेल तर ११२ या क्रमांकावर संपर्क साधा”, असं आवाहन दिल्ली पोलिसांनी केलं.