गुजरातमधील कच्छ जिल्ह्यात बुधवारी ३.५ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला आहे. अरबी समुद्रात सध्या’बिपरजॉय’ चक्रीवादळ घोंघावत आहे. हे चक्रीवादळ गुरुवारी कच्छच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. अशी एकंदरीत स्थिती असताना ‘बिपरजॉय’ चक्रीवादळ गुजरात किनारपट्टीवर धडकण्याआधी कच्छ जिल्ह्यात अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. त्यामुळे लोकांच्या मनात भीतीचं वातावरण पसरलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गांधीनगर येथील भूकंपशास्त्र संशोधन संस्थानं जारी केलेल्या माहितीनुसार, या भूकंपाचा केंद्रबिंदू कच्छ जिल्ह्यातील बछाऊपासून पश्चिम-नैऋत्य दिशेला ५ किलोमीटर अंतरावर होता. बुधवारी सायंकाळी ५ वाजून ५ मिनिटांनी भूकंपाचे धक्के बसले आहेत. यामध्ये घरांची पडझड झाल्याची किंवा जीवितहानी झाल्याची अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही. याबाबतचं वृत्त ‘इंडिया टुडे’नं दिलं आहे.

दुसरीकडे, भारतीय हवामानशास्र विभागाने (IMD) अतितीव्र झालेल्या ‘बिपरजॉय’ चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर गुजरातमधील सौराष्ट्र, द्वारका आणि कच्छ किनारपट्टीसाठी ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे. चक्रीवादळामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची शक्यता आहे. तसेच अनेक राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. ‘बिपरजॉय’ चक्रीवादळ कच्छ किनार्‍याकडे येत असल्याने गुजरातमधील आठ जिल्ह्यांतील समुद्राजवळ राहणाऱ्या सुमारे ५० हजार लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे.

त्याचबरोबर गुजरातमध्ये आपत्ती व्यवस्थापन आणि बचावकार्य करण्यासाठी एनडीआरएफची अठरा पथकं तैनात केली आहेत. एनडीआरएफची चार पथकं कच्छ जिल्ह्यात, राजकोट आणि देवभूमी द्वारकात प्रत्येकी तीन पथकं, जामनगरमध्ये दोन पथकं, तर पोरबंदर, जुनागढ, गीर सोमनाथ, मोरबी, वलसाड आणि वलसाड आणि गांधीनगर येथे प्रत्येकी एक एनडीआरएफचं पथक तैनात करण्यात आलं आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Earthquake in gujarat kutch cyclone biparjoy will landfall tommorrow imd give read alert rmm