हिमाचल प्रदेशमधील चंबा जिल्ह्यात आणि जम्मू-काश्मीरमधील काही भागात कमी तीव्रतेचे भूकंपाचे धक्के जाणवले. दरम्यान, भूकंपामुळे कोणतीही जीवित व वित्त हानी झाल्याचे वृत्त नाही.

सिमला हवामान विज्ञान केंद्राचे संचालक मनमोहन सिंग म्हणाले की, रात्री १२.३५ मिनिटांनी ३.४ रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का बसला. या भूकंपाचा केंद्रबिंदू हा चंबा जिल्ह्याच्या उत्तरपूर्व भागात जमिनीपासून १० किमी आत केंद्रीत होता. चंबासह हिमाचलचा बहुतांश भाग भूकंपासाठी अतिसंवेदनशील क्षेत्रात येतो. या परिसरात नेहमी भूकंपाचे सौम्य धक्के बसत असतात.

जम्मू-काश्मीरला गुरूवारी सकाळी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. ३.२ रिश्टर स्केलचा हा धक्का होता. आपत्ती निवारण अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, यामुळे कोणतीही जीवित आणि वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही. सकाळी ८.४३ वाजता भूकंपाचा धक्का जाणवला.