नेपाळच्या पश्चिम भागात ५.८ तीव्रतेचा भूकंप झाला आहे. या भूकंपामुळे अनेक घरांची पडझड झाली असून एकजणाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. या भूकंपाचा केंद्रबिंदू सुदूर-पश्चिम प्रांतातील बाजुरा जिल्ह्यातील मेळा भागात होता.
स्थानिक वेळेनुसार मंगळवारी दुपारी २ वाजून २८ मिनिटांनी भूकंपाचा धक्का बसला. भारतात दिल्ली व जयपूरच्या काही भागातही या भूकंपाचे धक्के बसले.उत्तराखंडमधील पिथोरागडच्या पूर्वेला १४८ किलोमीटरवर नेपाळमध्ये भूकंपाचा केंद्रबिंदू होता. या भूकंपात एकाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. तर अनेकजण जखमी झाले आहेत.
या भूकंपात एकूण चार घरे उद्ध्वस्त झाली आहेत, अशी माहिती ‘पीटीआय’ या वृत्तसंस्थेने पोलिसांच्या हवाल्याने दिली. तर बडीमालिका नगरपालिकेतील एका मंदिरालाही तडे गेल्याची माहितीही मिळत आहे. यूएस जिओलॉजिकल सर्व्हेच्या आकडेवारीनुसार, गेल्या एका वर्षात या परिसरात ४.५ किंवा त्याहून अधिक तीव्रतेचा हा दहावा भूकंप आहे.