देशातील उत्तरेचा संपूर्ण परिसर शनिवारी भूकंपाच्या  धक्क्यांनी हादरला. तब्बल दोन मिनिटापर्यंत झारखंड, छत्तीसगढ, हरयाणा, राजस्थान, मध्य प्रदेश या भागांसह संपूर्ण उत्तर भारताच्या परिसरात भूकंपाचे जोरदार धक्के बसत होते. यामध्ये आत्तापर्यंत ३४ जणांचा मृत्यू झाला असून मृतांमध्ये बिहारमधील २३, उत्तर प्रदेशातील आठ आणि पश्चिम बंगालमधील तिघांचा समावेश आहे.  
दिल्ली आणि बिहार या राज्यांत भूकंपाच्या धक्क्यांची तीव्रता सर्वाधिक जाणवली. दिल्लीत तीन ते चार मिनिटांपर्यंत भूकंपाने घरे आणि कार्यालयांचा परिसर हादरत होता. सकाळी ११ वाजून ४५ मिनिटांनी उत्तर भारताला भूकंपाचा पहिला धक्का जाणवला. तब्बल ३० सेकंद हे धक्के जाणवत होते. त्यानंतर १२ वाजून १९ मिनिटांनी दिल्लीला दुसऱ्यांदा भूकंपाचा धक्का जाणवला. त्यामुळे घरातील आणि कार्यालयातील लोक घाबरून रस्त्यावर आले. भूकंपाचे हे धक्के तीव्र होते की, घरातील फर्निचर आणि इतर सामान खाली पडले. तर कार्यालयातील कम्प्युटर स्क्रीन्स, भिंती आणि छतावर लावलेले सामान हादरत होते. नेपाळच्या सीमेला लागून असलेला पूर्व उत्तर प्रदेश, सिक्किम आणि हिमालयाच्या रांगांमध्ये असलेला पश्चिम बंगालचा परिसरात सर्वात जास्त तीव्रतेचे धक्के बसले. महाराष्ट्रातील नागपूर येथेही या भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले आहेत.
नेपाळच्या सीमेला लागून असलेल्या पश्चिम बंगाल आणि पूर्वेकडील राज्यांमध्ये सर्वात जास्त तीव्रतेचे धक्के बसले आहेत. या प्रकारानंतर दिल्ली आणि पश्चिम बंगाल येथील मेट्रो रेल्वेसेवा थांबविण्यात आली होती.
भूकंपाच्या तीव्र धक्क्यांनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि सिक्कीमचे मुख्यमंत्री पवन चॅमलिंग यांच्याशी संपर्क साधून दोन्ही राज्यातील परिस्थितीची माहिती घेतली. त्यानंतर नवी दिल्ली येथे भारताच्या विविध भागांतील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली अधिकाऱ्यांची आपातकालीन बैठक आयोजित करण्यात आली होती.