नेपाळमध्ये शक्तिशाली भूकंप झाल्यानंतर भारतातही धक्के बसले असून त्यात ५१ ठार तर इतर २३७ जण जखमी झाले आहेत. उत्तर, पूर्व भारतात अनेक इमारती व घरांना भूकंपाने तडे गेले. लोकांमध्ये मोठय़ा प्रमाणात घबराट पसरली. बिहार नेपाळच्याजवळ असल्याने तेथे १७ जण ठार झाले असून ४८ जण जखमी झाले आहेत. अनेक ठिकाणी घरांच्या भिंती कोसळल्या तर काही ठिकाणी छपरासह घरे कोसळली.
पश्चिम बंगालमध्ये भूकंपात दोन जण ठार झाले असून ६९ जण जखमी झाले आहेत त्यात ४३ शाळकरी मुलांचा समावेश आहे. उत्तर प्रदेशात सहा जण ठार झाले असून १२ लोक जखमी झाले आहेत. बिहारमध्ये पूर्व चंपारण जिल्ह्य़ात सहा जण ठार झाले असे आपत्कालीन व्यवस्थापन विभागाचे सचिव अनिरुद्ध कुमार यांनी सांगितले. दरभंगा येथे दोन जण मरण पावले तर सुपाल व अरारिया, पश्चिम चंपारण, शिवहार व सारण येथे प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला. राज्यात विविध ठिकाणी ४८ जण जखमी झाले. मंगळवारच्या वादळानंतर बिहारला आता भूकंपाने हादरा दिला आहे. राष्ट्रीय आपत्ती दलाची पथके अनेक जिल्ह्य़ांत रवाना झाली आहेत. पश्चिम बंगालमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू असताना भूकंपात तीन जण ठार झाले. दार्जिलिंगमध्ये दोन तर जलपायगुडी जिल्ह्य़ात एक जण ठार झाला. माल्डा जिल्ह्य़ात छत कोसळून चेंगराचेंगरीत ६९ जण जखमी झाले. सिक्कीममध्ये भूकंपाने दरडी कोसळल्या पण मोठी प्राणहानी झाल्याचे वृत्त नाही. उत्तर प्रदेशात ११ जणांचा बाराबंकी जिल्ह्य़ात मृत्यू झाला तर गोरखपूरला दोन व संत कबीरनगरला एकाचा मृत्यू झाला. बाराबंकीत बांधकाम सुरू असलेले घर कोसळून एक महिला व दोन मुले मरण पावली. गोरखपूरला अडीच वर्षांचे मूल व आणखी एक जण ठार झाला तर संत कबीरनगरमधील पूर्वा खेडय़ात आठ वर्षांची मुलगी घर कोसळून ठार झाली.
देशात भूकंपाचे ५१ बळी
नेपाळमध्ये शक्तिशाली भूकंप झाल्यानंतर भारतातही धक्के बसले असून त्यात ५१ ठार तर इतर २३७ जण जखमी झाले आहेत. उत्तर, पूर्व भारतात अनेक इमारती व घरांना भूकंपाने तडे गेले.
First published on: 26-04-2015 at 01:40 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Earthquake kills 51 in india