Delhi NCR Earthquake Today Updates : म्यानमारमध्ये शुक्रवारी ७.२ रिश्टर स्केलच्या तीव्रतेचा भूकंप झाल्याची माहिती समोर आली आहे. म्यानमारमधील या भूकंपाचे तीव्र धक्के बँकॉक आणि भारतालाही जाणवले आहेत. या भूकंपामुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. भारतातील दिल्ली आणि दिल्ली एनसीआरमध्ये या भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले आहेत. दिल्लीत या तीव्र धक्क्यामुळे कोणतीही जीवित हानी झालेली नाही.

म्यानमारमधील ७.७ रिश्टर स्केलच्या तीव्रतेच्या भूकंपामुळे किती नुकसान झाले यासंदर्भातील माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र, युनायटेड स्टेट्स जिओलॉजिकल सर्व्हेने सांगितलं की, भूकंप १० किमी खोलपर्यंत होता. या भूकंपाचे केंद्रबिंदु हा मंडाले शहरापासून १७.२ किमी अंतरावर होते. या संदर्भातील वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिलं आहे.

दरम्यान, वृत्तानुसार, भूकंपाच्या धक्क्यानंतर लोक घाबरून रस्त्यावर धावत होते. तसेच अनेक ठिकाणच्या स्विमिंग पूलमधून पाणी बाहेर पडले होते. म्यानमार अग्निशमन सेवा विभागाच्या एका अधिकाऱ्याने सांगितलं की, “जीवितहानी आणि नुकसानीची तपासणी करण्यासाठी आम्ही माहिती घेत आहोत. आतापर्यंत आमच्याकडे कोणतीही माहिती हाती आलेली नाही.”

दरम्यान, मंडाले येथील भूकंपाच्या धक्क्यानंतर काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यामध्ये काही इमारती हादरल्याचे दिसून येत आहे. भूकंपाच्या धक्क्यामुळे मोठ्या प्रमाणात हादरे बसल्यानंतर अनेक नागरिक घराबाहेर आल्याची माहिती सांगितली जात आहे. समोर आलेल्या वृत्तानुसार भूकंपाचा केंद्रबिंदू म्यानमारच्या दक्षिणी किनाऱ्याच्या सागाइंगच्या जवळ होता.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काय ट्वीट केलं?

म्यानमारमध्ये शुक्रवारी ७.७ रिश्टर स्केलच्या तीव्रतेचा भूकंप झाला आहे. या भूकंपासंदर्भातील काही व्हिडीओ देखील व्हायरल झाले आहेत. दरम्यान, याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं की, “म्यानमार आणि थायलंडमधील भूकंपानंतरच्या परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त करतो. सर्वांच्या सुरक्षिततेसाठी आणि कल्याणासाठी प्रार्थना करतो. भारत सर्वतोपरी मदत करण्यास तयार आहे.या संदर्भात, आमच्या अधिकाऱ्यांना सज्ज राहण्यास सांगितले. तसेच परराष्ट्र मंत्रालयाला म्यानमार आणि थायलंड सरकारच्या संपर्कात राहण्यास सांगितलं आहे”, असं मोदींनी म्हटलं आहे.