Earthquake in Japan Today : जपानच्या दक्षिणेकडील किनारपट्टीला आज ७.१ रिश्टर स्केल भूकंपाचा धक्का बसला आहे. यानंतर जपानच्या यंत्रणांनी या भागात त्सुनामी येण्याचा इशारा दिला आहे. जपानच्या सरकारी माहिती प्रसारण संस्था एनएचकेने दिलेल्या माहितीनुसार, जपानच्या दक्षिणेकडील क्युशू आणि शिकोकू या बेटांना त्सुनामीचा इशारा दिला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जपानच्या हवामान संस्थेने आज पहिल्यांदा माहिती देताना सांगितले की, भूकंपाची तीव्रता ६.९ रिश्टर स्केल इतकी नोंदविली गेली होती. परंतु नंतरच्या अनुमानात सुधार करून भूकंपाची तीव्रता ७.१ रिश्टर स्केल असल्याचे सांगितले गेले. जपानच्या दक्षिणेकडील मुख्य बेटांना भूकंपाचा धक्का बसल्याचे सांगितले जात आहे. तसेच या भूकंपाची खोली ३० किमीपर्यंत पसरल्याचेही हवामान संस्थेने सांगितले आहे.

हे वाचा >> भूकंप, त्सुनामीने हादरलं जपान! रस्त्यावर गाड्यांना लाटा आदळल्या, भिंत तुटली, धडकी भरवणारी दृश्य कॅमेरात कैद

जपान हवामान संस्थेने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार दक्षिणेकडील किनारपट्टीला जवळपास १ मीटरच्या लाटांची त्सुनामी धडकण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. एनएचकेच्या हवाल्याने रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिलेल्या बातमीनुसार, क्युशू बेटाजवळ २० सेंटीमीटर उंच लाटा पाहिल्या गेल्या आहेत.

दरम्यान क्युशू आणि शिकोकू बेटांवर असलेल्या अणुऊर्जा प्रकल्पांना हानी पोहोचली आहे का? याची तपासणी प्रकल्प चालकांकडून केली जात आहे. कागोशिमा येथील प्रशासनाने सेंडाई अणुऊर्जा प्रकल्पात कोणताही बिघाड झाला नसल्याचे सांगितले आहे. या प्रकल्पातील काम नेहमीप्रमाणे चालू आहे.

जपानमध्ये भूकंप का होतात? ‘रिंग ऑफ फायर’ नेमके काय?

जपानच्या भौगोलिक स्थानामुळे या देशातील बराचसा भाग भूकंपप्रवण क्षेत्रात मोडतो. ज्यामुळे जपानला भूकंपानंतर त्सुनामीचा धोका असतो. जपान देश ‘रिंग ऑफ फायर’च्या प्रभाव क्षेत्रात वसलेला आहे. ‘रिंग ऑफ फायर‘ ही प्रशांत महासागराच्या सभोवताली असलेली ज्वालामुखी आणि भूकंपाच्या ठिकाणांची एक शृंखला आहे. हे क्षेत्र अर्धवर्तुळाकार किंवा घोड्याच्या नालीच्या आकारासारखे असून ४० हजार २५० किलोमीटरपर्यंत पसरलेले आहे. या क्षेत्रालाच सर्कम-पॅसिफिक बेल्ट असेही म्हणतात. महत्त्वाचे म्हणजे या भागात ४०० पेक्षा जास्त सक्रिय ज्वालामुखी आहेत. रिंग ऑफ फायरचा भाग दक्षिण अमेरिकेच्या दक्षिणेकडील टोकापासून उत्तर अमेरिकेच्या पश्चिम किनारा तसेच जपान आणि न्यूझीलंडपर्यंत पसरला आहे.

हे ही वाचा >> जपानमध्ये भूकंपाच्या धक्क्यातून ‘असे’ बचावले एसएस राजामौली; दिग्दर्शकाच्या मुलाने सांगितला किस्सा

रिंग ऑफ फायरमध्ये बोलिव्हिया, चिली, इक्वेडोर, पेरू, कोस्टा रिका, ग्वाटेमाला, मेक्सिको, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, कॅनडा, रशिया, जपान, फिलीपिन्स, ऑस्ट्रेलिया, पापुआ न्यू गिनी, इंडोनेशिया, न्यूझीलंड आणि अंटार्क्टिका या ठिकाणांचा समावेश होतो.

नववर्षाच्या सुरुवातीलाच मोठा भूकंप

जपानची लोकसंख्या सुमारे सव्वा कोटी असल्याचे सांगितले जाते. जपान द्वीपसमूहावर दरवर्षी सुमारे १,५०० भूकंपाचे धक्के जाणवतात. त्यापैकी बरेचसे धक्के हे सौम्य स्वरुपाचे असतात. भूकंपाने होणारे नुकसान हे त्याचे स्थान आणि पृष्ठभागावरील वसाहतीनुसार बदलते, अशी माहिती हिंदुस्तान टाइम्सने दिली आहे. नववर्षाच्या सुरुवातीलाच जपानमध्ये मोठा भूकंप झाला होता. ज्यामध्ये २६० लोक मरण पावले होते.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Earthquake of magnitude 7 1 hits southern japan officials issued tsunami warning kvg