पापुआ न्यूगिनी येथे आज भूकंपाचा ७.४ रिश्टर तीव्रतेचा धक्का बसल्याने तेथील रहिवाशात घबराट उडाली. सुनामी लाटा उसळण्याची भीती व्यक्त करण्यात आली होती पण तसे काही घडले नाही. न्यू ब्रिटन भागात कोकोपो येथून ८३ मैलांवर भूकंपाचा केंद्रबिंदू होता व त्याची खोली ६३ किलोमीटर होती, असे अमेरिकेच्या भूगर्भशास्त्रीय पाहणी संस्थेने म्हटले आहे.
पहिल्या धक्क्य़ानंतर ५.९ रिश्टर तीव्रतेचा दुसरा धक्का बसला. पॅसिफिक सुनामी इशारा केंद्राने घातक सुनामी लाटा उसळण्याचा इशारा दिला होता पण तसे काही घडले नाही. पीएनजी जिओफिजिकल ऑब्झर्वेटरीचे भूकंपशास्त्रज्ञ मॅथ्यू मोईहोई यांनी सांगितले की, आताचा भूकंप हा भूगर्भात आठवडाभर चाललेल्या हालचालींचा परिणाम होता, पण या भूकंपाने घरे पडलेली नाहीत. कोकोपो येथे राहणाऱ्या अॅनेट सेटे या महिलेने सांगितले की, अलीकडे शक्तिशाली भूकंप झाले होते, पण हा धक्का मोठा होता. भूकंपानंतर शाळा बंद करून मुलांना घरी पाठवण्यात आले. अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला. झेनिया लोपेझ या कामगार महिलेने सांगितले की, आपण व सहकारी भूकंपानंतर पळत सुटलो, अतिशय भीतीदायक असा हा धक्का होता पण नुकसान झालेले नाही. ११० किलोमीटर अंतरावर असलेल्या जिवंत ज्वालामुखीशी या भूकंपाचा संबंध असल्याची शक्यता भूकंपशास्त्रज्ञ मोईहोई यांनी फेटाळून लावली. टेक्टॉनिक प्लेट्सच्या घर्षणामुळे हा भूकंप झाला, असाच सध्याचा निष्कर्ष असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
संग्रहित लेख, दिनांक 6th May 2015 रोजी प्रकाशित
पापुआ न्यूगिनीत भूकंपाचा मोठा हादरा
पापुआ न्यूगिनी येथे आज भूकंपाचा ७.४ रिश्टर तीव्रतेचा धक्का बसल्याने तेथील रहिवाशात घबराट उडाली. सुनामी लाटा उसळण्याची भीती व्यक्त करण्यात आली होती पण तसे काही घडले नाही.
First published on: 06-05-2015 at 02:37 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Earthquake rattles papua new guinea