नैऋत्य चीनमधील ग्विझू आणि युन्नान प्रांतांना बसलेल्या भूकंपाच्या धक्क्यात किमान ५० जण ठार तर १५० पेक्षा अधिक जण जखमी झाले. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता ५.७ इतकी नोंदली गेली. चायना अर्थक्वेक नेटवर्क सेंटर (सीईएनसी) या संस्थेने दिलेल्या माहितीनुसार स्थानिक वेळेप्रमाणे सकाळी ११ वाजून १९ मिनिटांनी यिलियांग आणि वेइनिंग परगण्यात हे भूकंपाचे धक्के नोंदवले गेले. यिलियांग येथे ४९ जण तर वेइनिंग येथे एका व्यक्तीचा मृत्यू झाला. या भूकंपाचा फटका सुमारे ७ लाख व्यक्तींना बसला असून सुमारे २० हजारांपेक्षा अधिक घरांची मोडतोड झाली आहे. भूकंपग्रस्तांपैकी १ लाखांहून अधिक जणांची सुटका करण्यात चीन सरकारला यश आले आहे. भूकंपप्रवण भागातील मदतकार्य सुरू असून कोसळलेल्या दरडींमुळे तसेच वीजप्रवाह खंडित झाल्यामुळे त्यात अनेक अडथळे येत आहेत. यामुळेच मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Story img Loader