नेपाळमध्ये शुक्रवारी भूकंपाचे आणखी दोन धक्के बसले असून लोकांमध्ये घबराट पसरली आहे, नेपाळ अजूनही भूकंपाच्या धक्क्य़ांमधून सावरलेला नसून तेथे आठ हजार बळी गेले आहेत. मध्य नेपाळमध्ये सकाळी भूकंपाचे कमी तीव्रतेचे धक्के बसले असून सिंधुपाल चौक व डोलखा जिल्ह्य़ात भूकंपाचा केंद्रबिंदू होता. पहाटे २.१९ वाजता ४ रिश्टरचा धक्का बसला त्याचा केंद्रबिंदू सिंधुपाल चौक जिल्ह्य़ात होता, असे राष्ट्रीय भूकंपमापन कें द्राने सांगितले. दुसरा धक्का सकाळी ६.१७ वाजता बसला. त्याची तीव्रता ५ रिश्टर होती व त्याचा केंद्रबिंदू डोलखा येथे होता.
 २५ एप्रिलच्या मुख्यभूकंपानंतर ४ रिश्टर व त्यापेक्षा जास्त तीव्रतेचे १५० धक्के बसले आहेत. भूकंपातील मृतांची संख्या ७८८५ झाली असून जखमींची संख्या १६,३९० आहे. सिंधुपाल चौक येथे तीन हजार तर काठमांडूत १२०९ जण मरण पावले आहेत.
 दरम्यान, भारतीय हवाई दलाने नेपाळच्या अधिकाऱ्यांनी विश्वासात न घेता मदतकार्य मोहिमा राबवल्या, असे वृत्त एका दैनिकाने दिले आहे. त्याचा भारतीय दूतावासाने इन्कार केला आहे. भारतीय लष्कराची विमाने नेपाळी लष्कराच्या समन्वयाने काम करीत होती व नेपाळ लष्कराचा एक अधिकारी प्रत्येक वेळी विमानात होता, असा दावा भारतीय दूतावासाच्या प्रवक्तयाने केला आहे. भारतीय हेलिकॉप्टर्सनी नेपाळमध्ये मदत पोहोचवण्यात मोठे काम केले आहे. त्यातही समन्वयाचा कुठलाही अभाव नव्हता, असे सांगण्यात आले.