जपानमध्ये सोमवारी ( १ जानेवारी ) भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले आहेत. यामुळे अनेक ठिकाणी घरांचं नुकसान झालं आहे. तर, रस्त्यांना भेगा पडल्याचंही समोर आलं आहे. भूकंपानंतर त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. होन्युशच्या पश्चिम किनारपट्टीवर असलेल्या नऊ प्रांतातील ९७ हजारांहून अधिक नागरिकांना सुरक्षितस्थळी जाण्याचा आदेश सरकारकडून देण्यात आला आहे.
जपानच्या हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, इशिकावा आणि परिसरात असलेल्या किनारपट्टीच्या भागात डझनभराहून अधिक भूकंप झाले. त्यातील एकाची तीव्रता ७.६ ‘रिश्टर स्केल’ होती. यामुळे समुद्रात ३ मीटरपेक्षा अधिक उंचीच्या लाटा उसळू शकतात. तसेच, इशिकावा, निगाता आणि तोयामा या किनारपट्टीवर त्सुनामी येऊ शकते.
हेही वाचा : भूकंप का होतात? भूकंपाच्या आधीच प्राणी व पक्षांना कशी लागते चाहूल?
जपानमध्ये २०११ साली आलेल्या भूकंपानंतर पहिल्यांदाच त्सुनामीबाबत मोठा इशारा देण्यात आला आहे. येत्या काही दिवसांत भूकंपाचे आणखी धक्के जाणवण्याची शक्यता जपानच्या हवामान विभागानं वर्तवली आहे. भूकंपानंतर इशिकावा आणि तोयामा प्रांतात वीज पुरवठा खंडीत झाला आहे. त्यामुळे ३६ हजार हून अधिक घरांची वीज गेली आहे, असं युटिलिटी होकुरिकू इलेक्ट्रिक पॉवरकडून सांगण्यात आलं.
हेही वाचा : भूकंप म्हणजे नेमके काय?
३० हजार लोकसंख्या असलेल्या वाजिमा शहरातील ३० इमारती कोसळल्या आहेत. अनेक इमारती आगीच्या भक्षस्थानी पडल्या असल्याचं रॉयटर्सनं म्हटलं.