दिल्ली एनसीआरसह उत्तर भारतात आज दुपारी चारच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले. ३.१ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यांनी दिल्ली हादरली. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने दिलेल्या माहितीनुसार या भूकंपाचं केंद्र हरियाणाच्या फरिदाबादमध्ये जमिनीपासून १० किलोमीटर खोल होतं. यापूर्वी ३ ऑक्टोबर रोजी राजधानी दिल्लीसह उत्तर भारतात भूकंपाचे धक्के जाणवले होते. त्या भूकंपाचा केंद्रबिंदू नेपाळमध्ये होता.
राजधानी दिल्लीत ३ ऑक्टोबर रोजी भूकंपाचे धक्के जाणवले होते. त्यावेळी नेपाळमध्ये ६.२ रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता. या भूकंपामुळे दिल्ली एनसीआरसह उत्तर भारतातील अनेक भागांमध्ये हादरे जाणवले होते. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने दिलेल्या माहितीनुसार ३ ऑक्टोबर रोजी दुपारी दोन वाजून २० मिनिटांनी ४.२ रिश्टर स्केलचा पहिला भूकंप झाला. त्यानंतर ६.२ रिश्टर स्केलचा दुसरा भूकंप झाला. या भूकंपामुळे दिल्लीसह आसपासच्या भागात बराच वेळ जमीन हादरत होती. यामुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं. आज पुन्हा एकदा तशीच परिस्थिती निर्माण झाली होती. परंतु, आजच्या भूकंपाची तीव्रता तुलनेने कमी होती.
हे ही वाचा >> Israel Hamas War : इस्रायलमध्ये घुसून नागरिकांची कत्तल करणारा हमासचा कमांडर ठार, दहशतवादी संघटनेचं मुख्यालय उद्ध्वस्त
पश्चिम अफगाणिस्तानमध्येही आज दुपारी भूकंपाचे धक्के जाणवले. आठवडाभरापूर्वी आलेल्या भूकंपामुळे आधीच अफगाणिस्तानातलं जनजीवन विस्कळीत झालं आहे. तालिबानच्या ताब्यात असलेला हा देश अजून त्या धक्क्यामधून सावरलेला नाही. तोच आज पून्हा एकदा अफगाणिस्तानात धरणीकंप झाला. गेल्या आठवड्यात अफगाणिस्तानात भूकंपामुळे २५०० हून अधिक लोकांचा बळी गेला आहे.