जपानच्या ईशान्येकडील भागातील समुद्रात ७.३ क्षमतेच्या भूकंपाचा धक्का बसल्याने तेथे सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. भूकंपाच्या धक्क्यामुळे टोकियोतील इमारतींना जोरदार हादरे बसले.
या भूकंपामुळे जवळपास एक मीटर उंचीच्या लाटा निर्माण झाल्या असून त्यामुळे मियागी किनाराच वाहून जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मार्च २०११ मध्ये आलेल्या सुनामीचा याच किनाऱ्याला जोरदार तडाखा बसला होता आणि त्यामध्ये हजारो लोक मृत्युमुखी पडले होते. समुद्रातील भूकंपामुळे लवकरच या किनाऱ्याला सुनामीचा तडाखा बसणार असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. अमेरिकेच्या भूगर्भ पाहणीत भूकंपाची तीव्रता ७.३ इतकी नोंदली गेली. इवाटे, फुकुशिमा, आओमोरी, इबाराकी तटवर्ती क्षेत्राला सुनामीचा इशारा देण्यात आला आहे.
फुकुशिमा अणू प्रकल्पाला यामुळे आणखी नुकसान पोहोचले असल्याचे वृत्त आलेले नाही, असे टोकियो इलेक्ट्रॉनिक पॉवरच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.