भारतात व्यवसाय करणे आता अधिक सोपे बनले आहे. व्यवसाय करण्यासाठी अनुकूल वातावरण असलेल्या देशांच्या यादीत भारताच्या क्रमावारीत मोठी सुधारणा झाली आहे. जागतिक बँकेने बुधवारी यासंबंधीचा महत्वाचा अहवाल जाहीर केला. भारताने व्यवसाय सुलभ देशांच्या यादीत १०० व्या स्थानावरुन थेट ७७ व्या स्थानी झेप घेतली आहे. म्हणजे भारताच्या क्रमवारीत २३ स्थानांची सुधारणा झाली आहे.

या यादीत एकूण १९० देश असून वर्ल्ड बँकेने आज क्रमवारी जाहीर केली. ब्रिक्स देशांमध्ये भारताच्या बरोबरीने चीनच्या क्रमावारीतही मोठी सुधारणा झाली आहे. मागच्यावर्षी चीन ७८ व्या स्थानी होता. आता ४६ व्या स्थानी पोहोचला आहे. मागच्या दोन वर्षात भारताच्या क्रमवारीत तब्बल ५३ स्थानांची सुधारणा झाली आहे. नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपद स्वीकारल्यापासून भारताच्या क्रमावरीत तब्बल ६५ स्थानांची सुधारणा झाली आहे. मागच्या वर्षी भारताच्या क्रमवारीत ३० स्थानांची सुधारणा झाली होती.

व्यवसाय सुलभतेचे जे १० निकष आहेत. त्यापैकी भारताने ८ निकषांमध्ये सुधारणा केली आहे. व्यवसाय अनुकूल देशांमध्ये न्यूझीलंड सर्वोच्च स्थानी असून सोमालिया व्यवसाय करण्यासाठी सर्वात वाईट देश आहे. पाकिस्तान या यादीत १३६ व्या स्थानी आहे. व्यवसाय सुरु करण्यासाठी बांधकाम परवानग्या, वीज, कर्जाची व्यवस्था, कररचना हे निकष व्यवसाय सुलभतेसाठी लक्षात घेतले जातात. वर्ल्ड बँकेच्या या अहवालामुळे मोदी सरकारला मोठा दिलासा मिळणार आहे. एकाबाजूला आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्चा तेलाच्या वाढणाऱ्या किंमती आणि डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण या कठीण परिस्थितीचा सामना करत असताना हा अहवाल समोर आला आहे.

Story img Loader