वैयक्तिकदृष्ट्या गोमांस खाणे ठीक आहे, मात्र त्यामुळे इतरांच्या भावना दुखावल्या जाऊ नयेत , असे मत ज्येष्ठ भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री कलराज मिश्र यांनी व्यक्त केले. लोकांना गोमांस खायचे असेल तर तुम्ही त्यांना कसे रोखू शकता?, परंतु, सामूहिक स्तरावर या सगळ्याचे समर्थन करणाऱ्या घोषणा देऊन बहुसंख्यांच्या भावना दुखावणे अयोग्य असल्याचे त्यांनी सांगितले. ध्रुवीकरण घडवून आणण्यासाठी गोमांसाचा मुद्दा चर्चेत ठेवला जातो. अशाप्रकारेच ध्रुवीकरण धोकादायक आहे. देशातील बहुसंख्य जनतेला हे सगळे नको आहे. अनेक लोक गोमांसाचे सेवन करतात, वैयक्तिक स्तरावर ते ठीक आहे. मात्र, हे सगळे करतान इतरांच्या भावना दुखावणार नाहीत, हे त्यांनी ध्यानात ठेवावे, असे मिश्र यांनी म्हटले. गोहत्या आणि गोमांस हे मुद्दे समाजात तिरस्कार निर्माण करणारे आहेत. सध्याच्या वातावरणात विश्वास आणि मैत्रीची गरज आहे. मात्र, गोमांसाच्या मुद्द्यावरून होणारे ध्रुवीकरण सगळ्यांसाठीच नुकसानकारक ठरेल. केवळ विकासाचे राजकारणच भाजपला पुढे नेऊ शकते, असे त्यांनी ‘दि इंडियन एक्स्प्रेस’ वृत्तपत्राशी बोलताना सांगितले.

Story img Loader