उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज शुक्रवारी (१९ जुलै) घेतलेल्या एका निर्णयामुळे विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. उत्तर प्रदेश राज्य सरकारकडून राज्यातील कांवड यात्रेच्या मार्गावर असलेल्या सर्व भोजनालयांच्या मालकांनी आपापली नावे दर्शनी भागात लावावीत, असा आदेश देण्यात आला आहे. याआधी उत्तर प्रदेश पोलिसांकडून मुझ्झफरनगरमधील भोजनालयांसाठी हा आदेश लागू करण्यात आला होता. त्याविरोधात विरोधी पक्षांनी प्रचंड विरोध दर्शवल्यानंतर मुझफ्फरनगरमधील पोलिसांनी त्यांचा हा आदेश मागे घेतला आहे. त्यानंतर आता मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कांवड यात्रेच्या मार्गावरील सर्वच भोजनालयांसाठी हा निर्णय लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार, प्रत्येक खाद्यपदार्थांचे दुकान अथवा हातगाडी चालकाला दर्शनी भागातील एका फलकावर मालकाचे नाव टाकावे लागेल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : उत्तर प्रदेशमधील खराब कामगिरीनंतर भाजपा ‘या’ दलित राजाबरोबर जोडू पाहत आहे लखनौचे नाते

ओळख उघड करण्याचे आदेश

कांवड यात्रेकरुंचे पावित्र्य अबाधित ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे. या निर्णयानुसार, खानावळी, भोजनालये, रेस्टॉरंट्स, धाबे अथवा लहान-सहान खाद्यपदार्थांच्या गाड्या अशा सर्वांनाच आपली ओळख दर्शनी भागात एक फलक लावून उघड करावी लागणार आहे. याआधी उत्तर प्रदेश राज्य सरकारमधील मंत्री कपिल देव अग्रवाल यांनी असा आरोप केला होता की, काही मुस्लीम विक्रेते हिंदू नाव धारण करुन यात्रेमध्ये मांसाहाराची विक्री करत आहेत. “ते वैष्णव धाबा भंडार, शाकुंभरी देवी भोजनालय आणि शुद्ध भोजनालय यांसारखी नावे देतात आणि मांसाहारी पदार्थांची विक्री करतात.” असा दावा त्यांनी केला होता.

२२ जुलैपासून कांवड यात्रा सुरू होणार असल्याने संपूर्ण उत्तर प्रदेशमध्ये सध्या जय्यत तयारी सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर, आता उत्तराखंड पोलिसांनीही कांवड यात्रा मार्गावरील भोजनालयांना मालकांची नावे फलकावर लावण्याचे आदेश जारी केले आहेत. माध्यमांशी बोलताना हरिद्वारचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक प्रमोद सिंह दाबोल म्हणाले की, “हॉटेल, ढाबे किंवा स्ट्रीट फूड स्टॉल चालवणाऱ्या सर्वांनाच त्यांच्या आस्थापनेवर मालकाचे नाव, क्यूआर कोड आणि मोबाइल नंबर प्रदर्शित करण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशांचे पालन ​​न करणाऱ्यांना कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल तसेच त्यांना कांवड मार्गावरूनही हटवण्यात येईल.”

हेही वाचा : हाथरस चेंगराचेंगरी प्रकरणी ‘भोले बाबा’वर आरोप का नाही? काँग्रेस-बसपा आक्रमक; भाजपा-सपाचा सावध पवित्रा

काय असते कांवड यात्रा?

श्रावण महिन्यामध्ये महादेवाची आराधना केली जाते. भारतातील शिवभक्तांसाठी हा महिना खास असतो. श्रावण महिन्यात शिवभक्त मंदिरात जाऊन शंकराचा जलाभिषेक करतात. श्रावण महिन्यातच कावड यात्राही काढली जाते; ज्यात भक्त पवित्र ठिकाणाहून गंगाजल आणतात आणि शिवलिंगाला अभिषेक करतात. कावड यात्रेचे विविध प्रकार आहेत. त्यामध्ये साधी कावड, डाक कावड, उभी कावड, झोका कावड असे प्रकार असतात.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Eateries on kanwar routes across up must display owners names chief minister yogi adityanath vsh