नासाची ‘एब’ व ‘फ्लो’ ही दोन अंतराळयाने आज चंद्रावर उतरली. ठरल्याप्रमाणे या दोन यानांचे आघाती अवतरण झाले.  अमेरिकेच्या पहिल्या महिला अंतराळयात्री सॅली राईड यांचे नाव ही याने जिथे उतरली त्या भागाला देण्यात येत आहे, असे नासाच्या निवेदनात म्हटले आहे.
नासाच्या ग्रॅव्हिटी रिकव्हरी अँड इंटिरियर लॅबोरेटरी (ग्रेल) या प्रकल्पातील ‘एब’ व ‘फ्लो’ ही दोन अंतराळयाने शुक्रवारीच कमी उंचीच्या कक्षेत आणली होती व नंतर ती चंद्राच्या उत्तर ध्रुवावरील पर्वताजवळ आदळवण्यात आली.
ही याने गेले वर्षभर चंद्राजवळच होती व आज ती सेकंदाला १.७ किलोमीटर इतक्या वेगाने चंद्राच्या पृष्ठभागावर आदळली. ‘गोल्डश्मि’ या विवराजवळ असलेल्या २.५ किलोमीटर उंचीच्या एका पर्वताच्या दक्षिण दिशेला ही याने सॅली राईड भागात उतरली आहेत, असे नासाने जाहीर केले आहे.
ग्रेल प्रकल्पाच्या मुख्य संशोधक मारिया झुबेर यांनी सांगितले की, सॅली राईड यांचे कार्य पुढील पिढीला प्रेरणा देणारे आहे. त्यामुळे ही याने जिथे आदळली त्या भागाला त्यांचे नाव देण्यात आले आहे. त्यांच्या कामाचा त्यामुळे गौरव करण्याची संधी आम्हाला मिळाली आहे.
या अंतराळयानांवर असलेल्या मूनकॅम या कॅमेऱ्याने १ लाख पंधरा हजार छायाचित्रे टिपली आहेत.
आघाती अवतरणाच्या अगोदर पन्नास मिनिटे त्यांची इंजिने प्रज्वलित करण्यात आली व त्यात जेवढे इंधन उरले होते तेवढय़ात ही मोहीम पूर्ण करण्यात यश आले.    
एब व फ्लो अंतराळयाने
एब व फ्लो ही दोन अंतराळयाने सप्टेंबर २०११ मध्ये सोडली होती. ती जानेवारी २०१२ पासून चंद्राची प्रदक्षिणा करीत होती. त्यांच्यात पुरेसे इंधन उरले नव्हते, त्यामुळे ती पुरेशा उंचीवर नव्हती, त्या कारणास्तव ही अंतराळयाने तेथील पृष्ठभागावर आदळवण्याचा निर्णय घेण्यात आला. चंद्रावरील जुळी याने आम्ही गमावली आहेत पण त्यांनी जी माहिती पाठवली आहे त्यांचे विश्लेषण करायला अनेक वर्षे लागतील, त्यामुळे या दोन अंतराळयानांची कामगिरी मोठी आहे, असे ग्रेल या प्रकल्पाचे व्यवस्थापक डेव्हिड लेहमान यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा