अवघ्या काही दिवसांवर होऊ घातलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार किरण बेदी निवडणूक आयोगाच्या पेचात सापडण्याची शक्यता आहे. किरण बेदी यांच्या नावे दोन वेगवेगळ्या पत्त्यांवर दोन मतदान ओळखपत्रे असल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली आहे. निवडणूक आयोगाने या प्रकरणाची दखल घेत चौकशी देखील सुरू केली आहे तर, आम आदमी आणि काँग्रेसच्या नेत्यांकडूनही किरण बेदींवर कारवाईची मागणी लावून धरली आहे. किरण बेदी यात दोषी आढळल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते.
निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार किरण बेदींकडे दोन मतदार ओळखपत्र आहेत. यातील एका ओळखपत्रावर उदय पार्क येथील तर, दुस-या मतदार ओळखपत्रावर तालकटोरा येथील पत्ता नमूद करण्यात आला होता. बेदींनी दोन पैकी एक ओळखपत्र रद्द करण्यासाठी अर्ज करणे अपेक्षीत आहे. बेदींनी तसे केले नसल्यास त्यांच्यावर कारवाई होऊ शकते असे निवडणूक आयोगाच्या अधिकाऱयांनी सांगितले. किरण बेदींनी मात्र यावर काही न बोलणेच पसंत केले आहे. आपचे निमंत्रक अरविंद केजरीवाल यांनी प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी केली आहे. तर कायद्याचे उल्लंघन केल्यामुळे बेदींवर फौजदारी खटला दाखल करण्याची मागणी काँग्रेस नेत्यांनी केली आहे.

Story img Loader