ECI On EVM And Voter Turnout Manipulation : केंद्रीय निवडणूक आयोगाने दिल्ली विधानसभा निवडणुकीचे वेळापत्रक आज दुपारी २ वाजता पत्रकार परिषदेत जाहीर केले. ७० आमदार असलेल्या दिल्ली विधानसभेचा कार्यकाळ २३ फेब्रुवारी रोजी संपणार आहे. दरम्यान निवडणूक आयोगाने निवडणुकीची घोषणा केल्यानंतर दिल्लीत आचारसंहिता लागू झाली आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुका जाहीर करताना मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी, ईव्हीएम मधील छेडछाड, मतदार याद्यांमधील घोळ आणि वाढलेल्या मतदानाच्या टक्केवारीवर करण्यात आलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. यावेळी त्यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी शेवटच्या पाच तांसांत मतदानाची टक्केवारी कशी वाढली याबाबतही स्पष्टीकरण दिले.
झूठ के गुब्बारों को बुलंदी मिलें…
यावेळी निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी शायरीच्या माध्यमातून ईव्हीएमवरील आरोप फेटाळून लावले. ते म्हणाले, “आरोप और इल्जामात का दौर चले, कोई गिला नहीं, झूठ के गुब्बारों को बुलंदी मिलें, कोई शिकवा नहीं, हर परिणाम में प्रमाण देते है, पर वो विना सबूत शक की नई दुनिया रौनक करते हैं और शक का इलाज तो हकीम लुकमान के पास भी नहीं!”
ईव्हीएम हॅकिंगचा कोणाताही पुरावा नाही…
दिल्ली विधानसभेची निवडणूक जाहीर करताना निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले, “ईव्हीएममध्ये कोणत्याही त्रुटीचा कोणताही पुरावा नाही. त्यामुळे ईव्हीएममध्ये व्हायरस किंवा बग असण्याचा तसेच मतमोजणीमध्ये काही छेडछाड करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. देशातील उच्च न्यायालये आणि सर्वोच्च न्यायालयाने सातत्याने हेच सांगितले आहे की, ईव्हीएम टेम्परिंगचे आरोप निराधार आहेत.”
महाराष्ट्र निवडणुकीचा दाखला
लोकसभा आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ दरम्यान खोटे मतदार जोडल्याचा आणि मतदानाच्या दिवशी सायंकाळी पाच नंतर मतदानाची टक्केवारी वाढवल्याचे खोटे आरोप करण्यात आल्याचे सांगत निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले, “मतदारांच्या आकडेवारीत फेरफार करणे अशक्य आहे. कारण मतदानाच्या अंतिम टक्केवारीची मतदानाच्या दिवशीच्या सायंकाळी पाच वाजताच्या आकडेवारीशी तुलना करणे दिशाभूल करणारे आहे. मतदानाची वेळ संपण्याच्या काही वेळ आधी मतदान अधिकाऱ्यांना अनेक कामे पार पडावी लागतात. त्याचबरोबर फॉर्म १७ सी मतदान केंद्रांवर मतदान संपल्यावर मतदान प्रतिनिधींना दिले जाते. त्यामुळे मतदानाच्या टक्केवारीत फेरफार केल्याच्या आरोपांमध्ये काहीच तथ्य नाही.”
हे ही वाचा : मोठी बातमी! बलात्कार प्रकरणातील दोषी आसाराम बापूला जामीन मंजूर, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
५ फेब्रुवारीला दिल्लीत मतदान
दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीसाठी ७० जागांवर एकाच टप्प्यात ५ फेब्रुवारीला मतदान होणार असून, याची मतमोजणी ८ फेब्रुवारी २०२५ रोजी होणार आहे. याबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाने आजच्या पत्रकार परिषदेत माहिती दिली.