अमेरिकेचे अर्थशास्त्रज्ञ अलविन रॉथ व लॉइड शापले यांना यंदाचे अर्थशास्त्राचे नोबेल पारितोषिक जाहीर झाले आहे. उपलब्ध असलेल्या शाळा व विद्यार्थ्यांची संख्या,तसेच रुग्ण व  अवयवदान करू शकणारे लोक या अनुषंगाने विविध घटकांची जुळणी करण्याबाबत त्यांनी संशोधन केले आहे. ‘रॉयल स्वीडिश अ‍ॅकेडमी ऑफ सायन्सेस’ या संस्थेने आज या पारितोषिकाची घोषणा केली. संस्थेने म्हटले आहे की, स्थिर वाटपाचा सिद्धांत व बाजारपेठ संरचना व्यवहार या विषयावर त्यांचे हे संशोधन आहे. शापले यांनी विविध जुळणी पद्धतींच्या तुलनात्मक अभ्यासासाठी गेम थिअरीचा वापर केला असून त्यात सर्व सहभागी घटकांना स्वीकार्य होईल अशा पद्धतीने जुळणी कशी करावी यावर प्रकाश टाकला आहे. त्यात खास अलगॉरिथम निर्मितीचाही समावेश आहे. रॉथ यांनी शापले यांच्या मूर्त संशोधन अभ्यास मालिकेचाच पाठपुरावा करताना नवीन डॉक्टर्स व रूग्णालये, विद्यार्थी व शाळा, रूग्ण व अवयवदाते यांची जुळणी करण्यासाठी संस्थांची फेरमांडणीचे तंत्र मिळवले.