केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने नियोजन आयोग मोडीत काढून स्थापलेल्या निती आयोगाच्या उपाध्यक्षपदी अर्थतज्ज्ञ डॉ. राजीव कुमार यांची नियुक्ती करण्यात आली. डॉ. अरविंद पानगढिया यांच्या राजीनाम्यानंतर केंद्र सरकारने राजीव कुमार यांना उपाध्यक्षपदावर संधी दिली आहे. तर दिल्लीतील एम्समधील बालरोगतज्ज्ञ डॉ. विनोद पॉल यांची निती आयोगाचे सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे.
मोदी सरकारमधील धुरिणांशी मतभेद झाल्यानंतर निती आयोगाचे पहिले उपाध्यक्ष डॉ. अरविंद पानगढिया यांनी पदाचा राजीनामा दिला होता. कोलंबिया विद्यापीठात अध्ययनासाठी पुन्हा रुजू व्हायचे असल्याने राजीनामा दिला असे कारण त्यांनी दिले होते. मात्र नोटाबंदी, कृषी, आरोग्य आदी क्षेत्रांतील सुधारणांवरुन त्यांचे सरकारसोबत मतभेद होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचाही पानगढिया यांना विरोध असल्याची चर्चा रंगली होती.
१ ऑगस्टरोजी पानगढिया यांनी तडकाफडकी राजीनामा दिला होता. ३१ ऑगस्टरोजी ते आयोगातील पदभार सोडतील. त्यांच्यानंतर उपाध्यक्षपदावर कोणाला संधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. शनिवारी रात्री सरकारने अर्थज्ज्ञ डॉ. राजीव कुमार यांची नियुक्ती केल्याचे जाहीर केले.
डॉ. कुमार हे सध्या ‘सेंटर फॉर पॉलिसी रिसर्च’ कार्यरत आहेत. अर्थविषयक पुस्तकांचे लिखाणही त्यांनी केले आहे. याशिवाय ‘फिक्की’चे ते माजी महासचिवदेखील आहेत. लखनौ आणि ऑक्सफर्ड विद्यापीठातून त्यांनी शिक्षण घेतले असून २००६ ते २००८ या कालावधीत ते केंद्र सरकारच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाचे सदस्यदेखील होते. एशियन डेव्हलपमेंट बँक, अर्थ आणि उद्योग मंत्रालयातील कामाचा त्यांना दांडगा अनुभव आहे. निती आयोगाचे उपाध्यक्ष हे थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अंतर्गत येतात.