दक्षिण अमेरिकास्थित असलेल्या इक्वाडोर देशात मुखवटाधारी बंदुकधाऱ्यांनी एका वृत्तवाहिनीच्या कार्यालयात घुसून धुडगूस घातला. इक्वाडोरच्या ग्वायाकिल शहरात असलेल्या टीसी टेलिव्हिजन नेटवर्कच्या कार्यालयात मंगळवारी हा प्रकार घडला. हल्लेखोरांनी न्यूजरूमध्ये घुसून बॉम्बने स्टडिओ उडवून देण्याची धमकी दिली. इक्वाडोरमध्ये गेल्या काही दिवसांपासून हिंसक कारवाया वाढल्यानंतर राष्ट्राध्यक्ष डॅनियल नोबोआ यांनी सशस्त्र हल्लेखोरांविरोधात लष्करी कारवाई करणार असल्याची घोषणा केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

इक्वाडोरमध्ये अमली पदार्थांचा व्यापार करणाऱ्या अनेक टोळ्या सक्रिय आहेत. यापैकी एका टोळीचा प्रमुख काही दिवसांपूर्वी तुरुंगातून पळाला, त्यानंतर इक्वाडोरमध्ये हिंसक घटना वाढल्या आहेत. सशस्त्र टोळ्यांचा हिंसाचार वाढल्यानंतर राष्ट्राध्यक्ष नोबोआ यांनी आणीबाणीसदृश्य परिस्थिती घोषित केली. त्यानंतर वृत्तवाहिनीवर हल्ला झाला.

मंगळवारी ग्वायाकिल शहरात असलेल्या टीसी टेलिव्हिजन नेटवर्कच्या कार्यालयात सशस्त्र हल्लेखोर घुसले. थेट प्रक्षेपण सुरू असलेल्या स्टुडिओचा त्यांनी ताबा घेतला. हल्लेखोरांनी स्टुडिओला बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिली. तसेच प्रक्षेपण सुरू असताना गोळीबार केला.

टीसी टेलिव्हिजनच्या प्रमुख ॲलिना मॅनरिक यांनी सांगितले की, जेव्हा हा हल्ला झाला तेव्हा त्या नियंत्रण कक्षात बसल्या होत्या. हल्लेखोरांपैकी एकाने त्यांच्या कपाळावर बंदूक रोखून त्यांना जमिनीवर बसण्यास सांगितले. या दहशतीचे जवळपास १५ मिनिटे थेट प्रक्षेपण करण्यात आले. त्यानंतर वृत्तवाहिनीचे सिग्नल बंद करण्यात आल्यामुळे प्रक्षेपण थांबले. मॅनरिक पुढे म्हणाल्या की, पोलिसांनी जेव्हा इमारतीला घेराव घातल्याचे समजले तेव्हा हल्लेखोरांनी तिथून पळ काढला.

राष्ट्राध्यक्ष डॅनिअल नोबोआ यांनी सोमवारी देशात आणीबाणी सदृश्य परिस्थिती जाहीर केली होती. अतिशय शक्तीशाली असलेल्या अमली पदार्थ्यांच्या टोळ्यांचा बंदोबस्त करण्यासाठी हा उपाय अमलात आणला होता. पण त्यानंतर हिंसक कारवायात वाढ झाली. काही ठिकाणी पोलिसांचे अपहरण करण्यात आले आहे. मंगळवारी थेट वृत्तवाहिनीवर हल्ला झाल्यामुळे गोबोआ यांनी याची गंभीर दखल घेत कारवाईला आणखी वेग आणला.

राष्ट्राध्यक्ष गोबोआ यांनी एक्स या सोशल साईटवर आपली भूमिका मांडताना म्हटले, सशस्त्र टोळ्यांचा बंदोबस्तसाठी लष्कराला कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या पोस्टमध्ये त्यांनी अलमी पदार्थ्यांचा व्यापार करणाऱ्या टोळ्यांचीही नावे जाहीर केली.

राष्ट्राध्यक्ष नोबोआ यांचे वय अवघे ३६ वर्ष एवढे आहे. अमली पदार्थांचा व्यापार करणाऱ्या टोळ्यांचा हिंसाचार आटोक्यात आणून त्यांचा बंदोबस्त करू असे आश्वासन त्यांनी निवडणुकीत दिले होते. त्यानंतर त्यांचा निवडणुकीत विजय जाला. नोव्हेंबर २०२३ मध्ये त्यांनी राष्ट्राध्यक्षपदाची जबाबदारी हाती घेतली.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ecuador tv studio taken over live on air by masked people brandishing guns kvg