Bengaluru Crime News: कर्नाटकातील वरिष्ठ राजकीय नेत्यांशी संबंध असल्याचे सांगत अनेक श्रीमंत लोकांची फसवणूक आणि मनी लाँड्रिंग केल्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) दोन दिवसांपूर्वी ऐश्वर्या गौडा (३३) या तरुणीला अटक केली आहे. गुंतवणुकीवर उच्च परतावा देण्याचे आश्वासन देत पीडितांची २० कोटींपेक्षा जास्त रकमेची फसवणूक केल्याचा आरोप गौडावर आहे. न्यायालयात हजर केल्यानंतर गौडाला पुढील चौकशीसाठी दोन आठवड्यांची ईडी कोठडी ठोठावण्यात आली आहे.

या प्रकरणातील आरोपी ऐश्वर्या गौडा श्रीमंत डॉक्टर आणि व्यावसायिकांपर्यंत पोहोचण्यासाठी कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार आणि काँग्रेस नेते डी. के. सुरेश यांची बहीण असल्याचे भासवायची, असा आरोप आहे. गेल्या वर्षी बेंगळुरू पोलिसांनी फसवणुकीच्या चार प्रकरणांमध्ये ऐश्वर्या गौडावर गुन्हा दाखल केला आहे.

ऐश्वर्या गौडाने पोलीसांचा वापर करून ज्वेलरी स्टोअर मालक असेलेल्या वनिता ऐथल यांचे कॉल डिटेल रेकॉर्ड मिळवल्याचा आरोप आहे. वनिता ऐथल यांनी गौडावर उच्च परताव्याचे आश्वासन देत ८ कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे सोने आणि पैसे घेतल्याचा आरोप केला आहे. ज्वेलर्स व्यतिरिक्त, गौडाने फसवणूक केल्याचा आरोप करणाऱ्यांमध्ये प्लास्टिक सर्जरी सेंटर चालवणारे दोन डॉक्टर, एक प्रसूती डॉक्टर आणि मंड्या येथील एका व्यावसायिक कुटुंबाचा समावेश आहे. याबाबत इंडियन एक्सप्रेसने वृत्त दिले आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, “आरोपी ऐश्वर्या गौडा डॉक्टर, व्यावसायिक आणि राजकीय नेत्यांपर्यंत पोहोचण्यासाठी श्रीमंत रिअल इस्टेट डीलर असल्याचे सांगायची. यासाठी तिने उत्तर बेंगळुरूमधील एका आलिशान हॉटेलमधील एका सुइटचा वापर केला होता जेणेकरून ती खूप श्रीमंत असल्याचे दिसून येईल. याचबरोबर तिच्याकडे अंगरक्षक आणि आलिशान गाड्यांचा ताफाही होता”.

ज्या राजकीय नेत्यांवर, ते आरोपी ऐश्वार्या गौडाशी संबंधित असल्याचा आरोप होत आहे, त्यामध्ये काँग्रेस आमदार विनय कुलकर्णी यांचा समावेश आहे. ऐश्वर्या आणि कुलकर्णी त्यांच्यातील जवळीक दाखवणारे आने सार्वजनिक फोटो उपलब्ध आहेत. गौडाने आमदार कुलकर्णी यांना एक आलिशान कार दिल्याचा आरोपही आहे. परंतु, कुलकर्णी यांनी ऐश्वार्या गौडा किंवा तिच्या ओळखीच्या कोणत्याही व्यक्तींकडून कोणत्याही भेटवस्तू स्वीकारल्या नसल्याचे म्हटले आहे. दोन दिवसांपूर्वी, ईडीने गौडा प्रकरणाच्या संदर्भात आमदार कुलकर्णी यांच्या मालकीच्या जागेवरही छापे टाकले होते.