ED Assistant Director Arrested : गेल्या काही वर्षात देशभरातील सीबीआय आणि ईडीची कारवाई हा विषय चांगलाच चर्चेत राहिला आहे. सीबीआय आणि ईडीच्या कारवाईसंदर्भात अनेकदा सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपही पाहायला मिळाले. मात्र, आता केंद्रीय अन्वेषण ब्युरो अर्थात सीबीआयने ईडीच्या सहाय्यक संचालकालाच लाचखोरीच्या प्रकरणात अटक केल्याची माहिती समोर आली आहे.
राजधानी दिल्लीत तब्बल २० लाखांची लाच घेताना अंमलबजावणी संचालनालयाच्या (ED) सहाय्यक संचालकाला अटक करण्यात आली आहे. ईडीच्या सहाय्यक संचालकाला लाच घेताना अटक करत सीबीआयने मोठी कारवाई केली. संदीप सिंह यादव असं अटक करण्यात आलेल्या ईडी अधिकाऱ्याचं नाव असल्याची माहिती मिळत आहे. दिल्लीतील लाजपत नगर परिसरात ही कारवाई करण्यात आली. मात्र, ईडीचा सहाय्यक संचालकच लाच घेताना पकडल्यामुळे दिल्लीत मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, यासंदर्भातील वृत्त एनडीटीव्हीने दिलं आहे.
दरम्यान, या अधिकाऱ्याने खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत एका व्यावसायिकाकडून तब्बल २० लाख रुपयांची मागणी केली होती. ही २० लाखांची लाच स्वीकारताना ईडीच्या सहाय्यक संचालकाला रंगेहात पकडण्यात आलं आहे. ईडीमध्ये दाखल झालेल्या गुन्ह्यात एका ज्वेलर्सच्या मुलाला दिलासा देण्याच्या बदल्यात ही लाच या अधिकाऱ्याने मागितली असल्याचं सांगितलं जात आहे.
ईडीच्या सहाय्यक संचालकाने एका व्यावसायिकाकडून २० लाखांची लाच मागितल्याची तक्रार सीबीआयला प्राप्त झाली होती. या तक्रारीनंतर सीबीआयने तात्काळ सापळा रचत ईडीच्या अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहाथ पकडलं. या प्रकरणी आता लाच घेणाऱ्या अधिकाऱ्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती देण्यात येत आहे.