नवी दिल्ली : दिल्लीचे मंत्री सत्येंदर जैन यांच्याशी संबंधित ४.८ कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) जप्त केली आहे. जैन यांच्याविरोधात केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल केला आहे. त्यावर आधारित ही कारवाई आहे.
जैन हे समभागधारक असलेल्या चार कंपन्यांना मिळालेल्या निधीचा स्रोत जैन यांना स्पष्ट करता आलेला नाही, असा दावा सीबीआयने केला आहे.
ईडीतर्फे मंगळवारी सांगण्यात आले की, सत्येंदर जैन आणि त्यांच्या नातेवाईकांचा संबंध असलेल्या कंपन्यांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. मंत्री जैन यांच्याविरोधात पैशांचे अवैध हस्तांतरण केल्याप्रकरणी चौकशी सुरू आहे. जप्त करण्यात आलेली मालमत्ता ही अकिंचन डेव्हलपर्स प्रा. लि., इंडोमेटल इम्प्लेक्स, परीयास इन्फोसोल्युशन्स, मंगलायतन प्रोजेक्टस आणि जेजे आयडियल इस्टेट यांच्या मालकीच्या आहेत. याशिवाय स्वाती जैन, सुशिला जैन, अजितप्रसाद जैन आणि इंदू जैन यांच्या मालकीची मालमत्ताही जप्त करण्यात आली आहे. ज्ञात स्रोतापेक्षा अधिक संपत्ती जमविल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.
ईडीच्या म्हणण्यानुसार, सत्येंदर जैन हे २०१५-१६ मध्ये लोकसेवक असताना वरील कंपन्यांना काही संशयास्पद कंपन्यांकडून ४.८१ कोटींचा निधी मिळाला. या व्यवहारात कोलकात्यातील व्यक्तींना हवालामार्गे पैसा पुरविण्यात आला होता. या पैशांतून दिल्ली परिसरात जमिनीची खरेदी करण्यात आली तसेच शेतजमिनीचे कर्ज फेडण्यात आले, असा ईडीचा दावा आहे. ईडीने काही दिवसांपूर्वीच जैन यांना चौकशीसाठी बोलावले होते.