नवी दिल्ली, कोची : केरळमधील कथित करुवन्नूर सेवा सहकारी बँक घोटाळा प्रकरणाशी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा (माकप) संबंध असल्याचा आरोप करत सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) या प्रकरणी पक्षाची जमीन आणि ७३ लाख रुपयांची बँक खाती जप्त केली. यासंबंधीची माहिती ‘ईडी’च्या अधिकाऱ्यांकडून शनिवारी देण्यात आली.

या प्रकरणी ‘ईडी’ने आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (पीएमएलए) तात्पुरता आदेश काढल्यानंतर विविध व्यक्ती आणि संस्थांच्या एकूण २८.६५ कोटी रुपये मूल्यांची मालमत्ताही जप्त केली आहे. अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात पुढे दाखल करावयाच्या पुरवणी आरोपपत्रामध्ये माकपचा आरोपी म्हणून उल्लेख केला जाऊ शकतो. तसे झाल्यास आम आदमी पक्षापाठोपाठ या आरोपांखाली चौकशी केली जाणारा माकप हा दुसरा पक्ष ठरेल. ‘आप’ला ‘ईडी’ने दिल्ली मद्या घोटाळा प्रकरणात आरोपी केले आहे.

हेही वाचा >>> प्रसिद्ध अमरनाथ यात्रेला उत्साहात प्रारंभ

दरम्यान, माकपने कोणताही गैरप्रकार केल्याचे आणि आर्थिक गैरव्यवहार केल्याचे आरोप फेटाळून लावले आहेत. ‘ईडी’ने बँक घोटाळ्याशी आपल्या पक्षाचा संबंध जोडण्याचा प्रयत्न केल्यास आपण कायदेशीर आणि राजकीय मार्गाने लढा देऊ असे माकपतर्फे सांगण्यात आले. पक्षाचे राज्याचे सरचिटणीस एम व्ही गोविंदन यांनी असा आरोप केला की, ‘ईडी’ राजकीय कारणांसाठी राजकीय पक्ष आणि त्यांच्या नेत्यांना विविध प्रकरणांमध्ये आरोपी करण्याचा प्रयत्न करत आहे.

‘ईडी’ने जप्त केलेल्या मालमत्तांमध्ये १८ स्थावर मालमत्तांचा समावेश असून त्याचे मूल्य २८.६५ कोटी इतके आहे. त्यामध्ये कथित घोटाळा प्रकरणातील लाभार्थ्यांच्या केरळमधील जमिनी आणि इमारतींचा समावेश आहे. त्यामध्ये पक्ष कार्यालयासाठी माकपच्या जिल्हा सचिवांच्या नावावर नोंदवलेली १० लाख रुपये मूल्य असलेल्या स्थावर मालमत्तेचा समावेश आहे असे ‘ईडी’ने आपल्या निवेदनात नमूद केले आहे. त्याबरोबरच माकपच्या स्थानिक समितींच्या जाहीर न केलेल्या आठ बँक खात्यातील ६३.६२ लाख रुपयेही जप्त करण्यात आले आहेत. माकपला हे पैसे लाभार्थ्यांकडून निधीच्या स्वरूपात मिळाल्याचा ‘ईडी’चा दावा आहे.