अंमलबजावणी संचलनालयाने (ईडी) शनिवारी मद्यसम्राट विजय मल्ल्या यांच्याविरुद्ध जप्तीच्या कारवाईचा बडगा उगारला. ईडीने मल्ल्यांची खासगी आणि युबी होल्डिंगची मिळून १४११ कोटींची मालमत्ता जप्त केल्याचे वृत्त आहे. ‘द हिंदू’ या वृत्तपत्राच्या माहितीनुसार, या कारवाईत मल्ल्यांच्या नावे बँकेत असलेली ३४ कोटींची रक्कम, मुंबई व बेंगळुरू येथील दोन फ्लॅट, कुर्ग येथील कॉफीचा मळा असलेली जमीन आणि मल्ल्यांच्या बेंगळुरू येथील औद्योगिक मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत. ‘ईडी’ने शुक्रवारी पीएमएलए न्यायालयाकडे मल्ल्यांना आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी फरारी म्हणून घोषित करण्याची मागणी केली होती. ईडी सध्या फक्त मल्ल्या यांच्या आयडीबीयच्या ९०० कोटी कर्ज घोटाळ्यासंबंधी तपास करत आहे. इतर तपासयंत्रणांशी चर्चा केल्यानंतर १७ बँकांच्या थकलेल्या ९००० कोटी कर्जासंबंधीही तपास केला जाण्याची शक्यता आहे.
काही दिवसांपूर्वीच मल्ल्या यांना भारताच्या ताब्यात देण्यास ब्रिटनने नकार दिल्यानंतर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मल्ल्या यांच्याविरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी करावी, अशी मागणी इंटरपोलकडे केली होती. भारतातील विविध १७ बँकांचे ९००० कोटी रुपयांहून अधिक कर्ज थकविणाऱ्या विजय मल्ल्या यांना भारताच्या ताब्यात देण्याबाबत ब्रिटनने असमर्थता व्यक्त केली होती. मल्ल्या गेल्या तीन महिन्यांपासून ब्रिटनमध्ये आहेत. मल्ल्या यांच्या प्रत्यार्पणासाठी भारताने विनंती केली असली, तरी त्याची पूर्तता करता येणार नाही, असे ब्रिटन सरकारने म्हटले होते.

Story img Loader