ED Chargesheet In National Herald Case: नॅशनल हेराल्डशी संबंधित मनी लाँड्रिंगच्या प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने मंगळवारी (१५ एप्रिल) काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी आणि इतरांविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. विशेष न्यायाधीश विशाल गोगणे यांनी ९ एप्रिल रोजी दाखल केलेल्या आरोपपत्राची दखल घेतली आणि पुढील सुनावणी २५ एप्रिल रोजी होणार आहे. यानंतर काँग्रेसने संताप व्यक्त केला आहे. याबरोबरच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यावर देखील टीका करण्यात आली आहे. काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया देत पोस्ट केली आहे.

काँग्रेसचे नेते जयराम रमेश सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हणाले आहेत की, “नॅशनल हेराल्डची मालमत्ता जप्त करणे हे कायद्याच्या नियमांचा आव आणून राज्य पुरस्कृत गुन्हा आहे. सोनिया गांधी, राहुल गांधी आणि इतरांविरोधात आरोपपत्र दाखल करणे हे वेगळे काही नसून पंतप्रधान आणि गृहमंत्री यांनी चालवलेले पूर्णपणे सूड आणि धमकावण्याचे राजकारण आहे. काँग्रेस पक्ष आणि त्यांचे नेतृत्व गप्प बसणार नाही. सत्यमेव जयते.”

दरम्यान ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्रात काँग्रेस नेते सॅम पित्रोदा आणि सुमन दुबे यांचा देखील आरोपी म्हणून समावेश करण्यात आला आहे. .

विशेष कोर्टात होणार सुनावणी

या प्रकरणी विशेष न्यायालयात २५ एप्रिल रोजी सुनावणीची तारीख निश्चित करण्यात आली आहे. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल करण्याची ही पहिलीच वेळ आहे. दरम्यान, काँग्रेसशी संबंधित नॅशनल हेराल्ड वर्तमानपत्र आणि असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड (एजेएल) यांच्या मालकीची ६६१ कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता ताब्यात घेण्यासाठी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) ११ एप्रिल रोजी नोटिसा बजावल्या होती.

ईडीकडून या प्रकरणाची चौकशी २०२१ मध्ये सुरू करण्यात आली होती. भाजपा नेते सुब्रमन्यम स्वामी यांनी एक खाजगी तक्रार दिली होती. त्यानंतर दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टाने जून २०१४ मध्ये एक आदेश जारी केला होता. स्वामी यांनी दावा केला होता की सोनिया गांधी, राहुल गांधी आणि इतरांसह काँग्रेसच्या नेत्यांबरोबर यंग इंडियन प्रायव्हेट लिमिटेड नावाच्या कंपनीने एजेएल संबंधित २,००० कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या संपत्तीवर फसवणूकीच्या माध्यमातून ताबा मिळवला आहे.