ED seizes Rs 1.5 crorefrom L2: Empuraan producer : प्रवर्तन निदेशालय (ईडी)ने शुक्रवारी आणि शनिवारी श्री गोपालन चिट अँड फायनान्सेस कंपनी लिमिटेड आणि त्याचे अध्यक्ष गोकूल गोपालन यांच्याशी संबंधित परिसरांमध्ये छापेमारी केली. ही छापेमारी एक हजार कोटी रुपयांच्या परकीय चलन व्यवस्थापन कायदा, १९९९ च्या उलंघनाच्या प्रकरणात केली आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार शुक्रवारी सकाळी तमिळनाडू, केरळ आणि कर्नाटक येथे छापेमारीला सुरूवात झाली. अनिवासी भारतीयांबरोबर व्यावहारांदरम्यान नियमांचे उल्लंघन झाल्याची आणि अनाधिकृत देवाणघेवान झाल्याची माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली होती.

दरम्यान शनिवारी ईडीने या छापेमारीत जप्त केलेल्या पैशांचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. याबरोबरच ईडीच्या अधिकृत अकाउंटवरून या कारवाईबद्दल माहिती देण्यात आली आहे. “ईडी, कोची झोनल ऑफिसने ४ एप्रिल २०२५ आणि ५ एप्रिल २०२५ रोजी फेमा, १९९९ कायद्या अंतर्गत केरळमधील कोझिकोड येथील एका ठिकाणी आणि तमिळनाडूमधील चेन्नई येथील दोन ठिकाणी श्री गोकुलम चिट्स अँड फायनान्स कंपनी प्रायव्हेट लिमिटेडच्या निवासी आणि व्यावसायिक परिसरात शोध मोहीम राबवली. या छाप्यांमध्ये १.५० कोटी रुपये रोख आणि फेमा,१९९९ च्या उल्लंघनासंबंधी कागदपत्रे जप्त करण्यात आली,” असे ईडीने म्हटले आहे.

ईडीकडून चेन्नई येथील या फर्मविरोधात विविध राज्यातील पोलीसांकडून दाखल करण्यात आलेल्या अनेक फसवणुकीच्या प्रकरणाची चौकशी केली जात आहे. एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, या वर्षी जानेवारीमध्ये मलप्पुरम जिल्ह्यात फर्मच्या विरोधात अनेक एफआयआर दाखल केले गेले होते. भारतीय दंड संहितेचे वेगवेगळ्या कलमांतर्गत आणि चिट फंड कायद्याच्या कलमांतर्गत दाखल प्रकरणे पीएमएलए अंतर्गत अनुसूचित गुन्हा आहेत.

या फर्मच्या वेबसाईटवर देण्यात आलेल्या माहितीनुसार याची स्थापना जुलै १९६८ मध्ये चैन्नई येथे ए.एम. गोपालन उर्फ गोकुलम गोपालन यांनी केली होती आणि याच्या एकूण ४७९ शाखा आहेत. दक्षिण भारतात या चिट फंड व्यवसायाची व्याप्ती मोठी आहे. फर्मचा दावा आहे की ते देशातील सर्वात मोठ्या चिट फंड कंपन्यांपैकी एक आहेत.

ही फर्म चालवणारी समूह कंपनी श्री गोकुलम ही मोहनलाल यांचा ‘एल-२ एम्पुरान’ची सहनिर्माता झाल्यानंतर चर्चेत आली होती. दरम्यान २००२ च्या गुजरात दंगलींच्या चित्रपटातील चित्रणावरून वाद निर्माण झाला होता. या विरोधाला तोंड देत, निर्मात्यांनी चित्रपटातील २४ दृश्ये कापली आणि सेन्सॉर केलेली आवृत्ती पुन्हा प्रदर्शित केली. शिवाय मोहनलाल यांनी जाहीर माफीही मागितली. या आव्हानांना तोंड देत ‘एल-२ एम्पुरान’ने स्थानिक आणि जागतिक स्तरावर कामईचे अनेक विक्रम मोडले आहेत.