तृणमूल काँग्रेसच्या नेत्या आणि बडतर्फ खासदार महुआ मोईत्रा यांच्या विरोधात ईडीने प्रश्नांच्या बदल्यात पैसे मागितल्याप्रकरणी मनी लाँडरिंगचा गुन्हा दाखल केला आहे. कॅश फॉर क्वेरी प्रकरणावरील नीतिमत्ता समितीचा अहवाल आल्यानंतर तृणमूल काँग्रेसच्या महुआ मोइत्रा यांना लोकसभेतून बडतर्फ करण्यात आले होते. मोइत्रा यांनी लोकसभेत प्रश्न विचारण्यासाठी व्यावसायिक दर्शन हिरानंदानी यांच्याकडून रोख रक्कम आणि महागड्या भेटवस्तू घेतल्या होत्या, असा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. महुआ मोइत्रा आता पुन्हा एकदा लोकसभेच्या रिंगणात उतरल्या आहेत. टीएमसीने त्यांना पश्चिम बंगालमधील कृष्णानगर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. मात्र, यानंतर मोईत्रा यांच्यासमोरील अडचणी वाढल्या आहेत.
केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने दोन दिवसांपूर्वीच महुआ मोईत्रा यांच्याविरोधात एफआयआर दाखल केला होता. ईडीने महुआ मोईत्रा यांना चौकशीसाठी दिल्ली कार्यालयात हजर राहण्याचे समन्स बजावले होते. मात्र समन्सला कोणतेही उत्तर न दिल्यामुळे त्यांच्याविरोधात खटला दाखल करण्यात आला आहे. फेमा कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी आता महुआ मोईत्राची चौकशी होणार आहे.
बडतर्फ खासदार महुआ मोईत्रा यांना तृणमूल काँग्रेस पक्षाने पुन्हा एकदा क्रिष्णानगर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे. व्यावसायिक हिरानंदानी यांच्याकडून लोकसभेत प्रश्न विचारण्याच्या बदलण्यात पैसे आणि भेटवस्तू स्वीकारल्याबद्दल त्यांना दोषी ठरविण्यात आले होते. व्यावसायिकाने महुआ मोईत्रा यांचे लॉगिन आणि पासवर्ड वापरून अदाणी समूहाच्या विरोधात प्रश्न विचारले. वकील जय अनंत देहाद्री यांनी सर्वप्रथम हे प्रकरण उजेडात आणले. त्यानंतर भाजपाचे खासदार निशिकांत दुबे यांनी लोकसभेत हा मुंडा मांडून त्याबद्दल लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे टीकचा मांडला.
महुआ मोईत्रा यांनी मात्र आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले. मी अदाणी समूहाच्या विरोधात प्रश्न विचारला म्हणून मला लक्ष्य केले जात आहे, असेही त्या म्हणाल्या. निवडणुकीतील माझा विजयच हा मला दिलेला त्रास आणि छळवणुकीवरचे उत्तर असेल, असे सांगून लोकसभेला आपला विजय होईल, असे मोईत्रा यांनी सांगितले. क्रिष्णानगर येथे चौथ्या टप्प्यात १३ मे रोजी मतदान होणार आहे.