माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांचे सुपुत्र कार्ती चिदंबरम यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. चिनी नागरिकांच्या व्हिसाप्रकरणी ईडीनेही कार्ती चिदंबरम यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. काही दिवसांपूर्वी याच प्रकरणी सीबीआयने कार्ती यांच्यावर गुन्हा दाखल केला होता.
सीबीआयनंतर आता ईडीकडूनही गुन्हा दाखल
काही दिवसांपूर्वी बेकायदेशीर व्यवहार आणि बेहिशोबी मालमत्ते प्रकरणी सीबीआयने एकाच वेळी कार्ति यांच्याशी संबंधित ११ ठिकाणी धाड टाकली होती. तसेच २५० चिनी नागरिकांना व्हिसा देण्यासाठी ५० लाख लाच घेतल्याच्या आरोपाखाली सीबीआयने गुन्हा दाखल केला होता. तसेच कार्ती यांच्यावर चीनी नागरिकांना व्हिसा पुरवल्याच्या घोटाळा प्रकरणात खटला दाखल केला आहे. कार्ती यांच्याशी संबंधित ११ ठिकाणांवर कारवाई केल्यानंतर त्यांच्या निकटवर्तीय भास्कर रमणलाही सीबीआयने अटक केली होती.
काय आहे प्रकरण?
सीबीआयने नोंदवलेल्या गुन्ह्यानुसार हे प्रकरण २०११ चे आहे. पी चिदंबरम त्यावेळी गृहमंत्री होते. शेडोंग इलेक्ट्रिक पॉवर कन्स्ट्रक्शन कॉर्पोरेशन या चिनी कंपनीला पंजाबमधील मानसा येथे पॉवर प्लांट बांधण्यासाठी तलवंडी साबो पॉवर लिमिटेडकडून कंत्राट मिळाले होते. पॉवर प्लांटच्या बांधकामात होणारा विलंब आणि वेळेवर काम पूर्ण न केल्याने मोठा दंड टाळण्यासाठी अतिरिक्त चिनी तज्ज्ञ आणण्याची सेप्कोला नितांत गरज होती. परंतु गृह मंत्रालयाने मर्यादित संख्येने व्हिसा जारी केल्यामुळे सेप्को तज्ज्ञ आणू शकले नाही. सीबीआयच्या म्हणण्यानुसार, टीएसपीएलचे उपाध्यक्ष विकास मखरिया यांनी पी चिदंबरम यांचे निकटवर्तीय भास्कर रमन यांच्याशी संपर्क साधला. भास्कर रमन यांनी ५० लाखांच्या मोबदल्यात काम करून देण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर चिनी कंपनीच्या २६३ तज्ज्ञांच्या व्हिसाची मुदत वाढवण्यात आली. यानंतर मुंबईतील बेल टूल्स लिमिटेड या कंपनीला बनावट पावत्यांद्वारे ५० लाख रुपये पाठवण्यात आले आणि तेथून ही रक्कम भास्कर रमन आणि कार्ती चिदंबरम यांच्यापर्यंत पोहोचली. कार्ती चिदंबरम यांच्या विरोधात भक्कम इलेक्ट्रॉनिक आणि इतर पुरावे असल्याचे सीबीआयचे म्हणणे आहे.