अंमलबजावणी संचलनालयाने अर्थात ईडीने दिल्ली, बिहार आणि उत्तर प्रदेशातल्या लालूप्रसाद यादव यांच्या १५ ठिकाणांवर छापेमारी केली आहे. लालूप्रसाद यादव आणि त्यांचे निकटवर्तीय यांच्यावर ईडीने ही कारवाई केली आहे. लँड फॉर जॉब या स्कॅमच्या अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. याआधी सीबीआयने बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडीदेवी यांचीही चौकशी केली होती. ईडीने दिल्लीतल्या फ्रेंड्स कॉलनीमध्ये तेजस्वी यादव यांच्या घरावरही छापा मारला आहे. तर पाटणा या ठिकाणी आरजेडीचे माजी आमदार अबू दोजाना यांच्या घरीही छापेमारी केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भाजपाचा २०२४ मध्ये सफाया होणार

ईडीने केलेल्या या कारवाईनंतर राजदचे प्रवक्ते मृत्यूंजय तिवारी यांनी सांगितलं की भाजपाचा लोकशाहीवर विश्वास उरलेला नाही यामुळेच आम्हाला त्रास दिला जातो आहे. लोकांना हे सगळं दिसतं आहे. २०२४ मध्ये भाजपाचा सफाया होईल.

राबडीदेवींची सीबीआयमार्फत चौकशी

याआधी सीबीआयने सोमवारी बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडीदेवी यांची चौकशी केली होती. त्यानंतर सीबीआयच्या टीमने दिल्लीतल्या मीसा भारती यांच्या घरीही जाऊन त्यांची चौकशी केली होती.

रोहिणी आचार्य यांचं ट्विट काय?

लालूप्रसाद यादव यांची चौकशी सुरू झाल्यानंतर त्यांची मुलगी रोहिणी आचार्य हिने ट्विटच्या माध्यमातून केंद्र सरकारवर आरोप केले आहेत. “माझ्या ७४ वर्षीय बाबांना नाहक त्रास दिला जात आहे. जर त्यांना काही झालं तर मी कुणालाही सोडणार नाही. माझ्या बाबांना अशा प्रकारे त्रास देणं हे योग्य नाही. या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवल्या जातील. वेळ खूप बलवान असते, यात खूप ताकद असते. हे कुणीही विसरू नये”, या आशयाचं ट्विट रोहिणी आचार्य यांनी केलं आहे.

जमिनीच्या बदल्यात नोकरी हा घोटाळा काय आहे?

मे २०२२ मध्ये, सीबीआयने लालूप्रसाद, राबडी देवी आणि त्यांची मुलगी मिसा भारती आणि हेमा यादव यांच्याविरोधात भ्रष्टाचाराचा खटला दाखला केला. लालूप्रसाद केंद्रीय रेल्वेमंत्री असताना त्यांनी रेल्वेमध्ये नोकरी लावून देण्याच्या बदल्यात भूखंड स्वीकारले, असा त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आला आहे. सीबीआयच्या माहितीनुसार, लालूप्रसाद रेल्वेमंत्री असताना पाटण्यातील १२ लोकांना रेल्वेच्या गट ‘ड’ पदांवर नियुक्ती देण्यात आली होती. या नियुक्त्यांच्या बदल्यात लालूप्रसाद कुटुंबीयांना पाटणा आणि आसपासच्या परिसरातील सात भूखंड अतिशय कमी दरात मिळाले. हे भूखंड ज्या १२ लोकांना रेल्वेत नोकरी मिळाली त्यांच्या कुटुंबाचे होते, अशी माहिती सीबीआयने दिली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ed is conducting searches at 15 locations in connection with alleged land for job scam lalu yadav scj