पाकिस्तानी गायक राहत फतेह अली खान यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. परकीय चलन बेकायदेशीरपणे भारताबाहेर नेल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.
राहत फतेह अली खान यांची २०११ मध्ये दिल्लीतील विमानतळावर तपासणी करण्यात आली होती. महसूल गुप्तवार्ता संचालनालयाच्या (डीआरआय) अधिकाऱ्यांनी राहत फतेह अली खान यांची तपासणी केली असता त्यांच्याकडे १.२४ लाख अमेरिकी डॉलर सापडले होते. चौकशी दरम्यान इतकी रक्कम कुठून आली, याची माहिती खान देऊ शकले नाही. राहत फतेह अली खान यांनी परकीय चलनाची तस्करी केल्याचा संशय आहे.
‘फेमा’ (परकीय चलन व्यवस्थापन कायदा ) अंतर्गत येणाऱ्या प्रकरणांचा तपास ईडीकडून केला जातो. सध्या हे प्रकरण ईडीकडे आहे. या प्रकरणात ईडीने आता खान यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. राहत फतेह अली खान समाधानकारक उत्तर देण्यात अपयशी ठरल्यास त्यांच्या अडचणी वाढू शकतात. त्यांच्यावर ३०० टक्के दंड आकारला जाऊ शकतो. तसेच भारतात लूक आऊट नोटीस देखील जारी केली जाऊ शकते, असे सूत्रांनी सांगितले.