तृणमूल काँग्रेसमधील काही प्रमुख नेत्यांविरोधात सक्तवसुली संचलनालयाने ( ईडी) नारद स्टिंग ऑपरेशन प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. मागील आठवड्यामध्ये सीबीआयने तृणमूलच्या १२ नेत्यांविरोधात एफआयआर दाखल केली होती. राज्यसभा खासदार मुकूल रॉय, लोकसभेचे खासदार सुलतान अहमद आणि सौगाता रॉय यांचा देखील या प्रकरणात समावेश आहे. सीबीआयने दाखल केलेल्या एफआयआरच्या आधारावर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर तृणमूल काँग्रेसच्या अडचणीत वाढ झाली आहे.

महापौर सोवन चॅटर्जी, इक्बाल अहमद, काकोली घोष, प्रसून बॅनर्जी, सुवेंदु अधिकारी, सुब्रत मुखर्जी, फिरहाद हाकिम, अपरूपा पोद्दार आणि सय्यद मोहम्मद हुसेन मिर्झा यांची नावे देखील तक्रारीमध्ये आहेत. गत विधानसभा निवडणुकीपूर्वी हे स्टिंग ऑपरेशन करण्यात आले होते. यामध्ये पश्चिम बंगालमधील सत्तारूढ तृणमूल काँग्रेसचे काही नेते कथितरित्या लाच घेताना दाखवण्यात आले होते. हे प्रकरण केंद्र आणि राज्य सरकारमधील संघर्षामुळे चिघळले होते. गुन्हा नोंदवल्यामुळे आता ममता बॅनर्जी सरकारसमोरील अडचणीत वाढ होण्याची चिन्हे आहेत.

सीबीआयने प्राथमिक चौकशी करावी, असा आदेश कोलकाता उच्च न्यायालयाने यापूर्वी दिला होता. नारद न्यूजचे संपादक मॅथ्यू सॅम्युअल यांनी न्यायालयाला असे सांगितले होते की, आयफोनवर या चित्रफिती केल्या असून त्या लॅपटॉपवर टाकून नंतर पेनड्राइव्हवर घेण्यात आल्या. उच्च न्यायालयाने नेमलेल्या समितीने पेनड्राइव्ह, लॅपटॉप व आयफोन ताब्यात घेतले आहेत. सार्वजनिक पातळीवर काम करणाऱ्या नेत्यांचे वर्तन संशयातित असले पाहिजे, असे मत न्यायालयाने व्यक्त केले होते. ज्यांच्यावर आरोप आहेत ते मंत्री, खासदार व राज्यातील वरिष्ठ नेते असून ही गंभीर बाब लक्षात घेता चौकशी राज्याच्या संस्थेकडे ठेवणे योग्य नाही, त्यामुळे ती सीबीआयकडे देत असल्याचे न्यायालयाने त्यावेळी म्हटले होते.

Story img Loader