पश्चिम बंगाल सरकारमधील मंत्री पार्थ चटर्जी यांचे निकटवर्तीय असेलेल्या अर्पिता मुखर्जी यांच्या घरातून २० कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. जप्त करण्यात आलेली ही रोकड स्कूल सर्व्हिस कमिशन घोटाळ्याशी निगडित असल्याचा संशय सक्तवसुली संचालनालयाला (ईडी) आहे. ही रोडक मोजण्यासाठी ईडीने बँकेच्या अधिकाऱ्यांना बोलावले आहे. या कारवाईत ईडीने अर्पिता मुखर्जी यांच्या घरातून रोख रकमेसोबतच तब्बल २० मोबाईल जप्त केले आहेत.
हेही वाचा >>> नीरव मोदीला ईडीचा दणका; हीरे, दागिने, बँक बॅलन्ससह कोट्यवधींची संपत्ती ईडीकडून जप्त
ममता बॅनर्जी यांच्या मंत्रिमंडळात पार्थ चटर्जी सध्या उद्योग आणि वाणिज्य मंत्री आहेत. एसएससी घोटाळा झाला तेव्हा चटर्जी शिक्षणमंत्री होते. याच चटर्जी यांच्या निकटवर्तीय मानल्या जाणाऱ्या अर्पिता चटर्जी यांच्या घरावर आज ईडीने धाड टाकली. या कारवाईत ईडीने २० कोटी रुपयांची रोकड जप्त केली आहे. तसेच या रोख रकमेसह पोलिसांनी २० मोबाईल फोन जप्त केले आहेत. जप्त करण्यात आलेली रोकड आणि मोबाईल हे स्कूल सर्व्हिस कमिशनमधील घोटाळ्याशी निगडित असल्याचा संशय ईडीला आहे. अर्पिता चटर्जी यांच्याव्यतिरिक्त ईडीने शिक्षण राज्यमंत्री परेश सी अधिकारी तसेच आमदार माणिक भट्टाचार्य तसेच अन्य काही व्यक्तींवरही कारवाई केली आहे.
हेही वाचा >>> नुपूर शर्मा यांना मारण्यासाठी आलेल्या पाकिस्तानी घुसखोराकडून धक्कादायक खुलासा; म्हणाला, “पाकिस्तानात….”
एसएससी घोटाळा काय आहे?
पश्चिम बंगालमधील एसएससी घोटाळ्यामध्ये सरकारी आणि अनुदानित शाळांमध्ये बेकायदेशीर नियुक्त्या करण्यात आल्या, असा आरोप आहे. हे प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर कोलकाता उच्च न्यायालयाने या घोटाळ्याची चौकशी सीबीआय मार्फत करण्याचे आदेश दिले होते.