काँग्रेस पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची चौकशी केल्यानंतर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) नॅशनल हेराल्डच्या मुख्यालयावर छापा टाकला आहे. नॅशनल हेराल्ड गैरव्यवहारप्रकरणी ईडीकडून दिल्लीतील अनेक ठिकाणी छापेमारी सुरू आहे.

सध्या नॅशनल हेराल्डच्या चौथ्या मजल्याची ईडीकडून झडती घेतली जात आहे. याच मजल्यावर वृत्तपत्राचं कार्यालय आहे. मंगळवारी सकाळी दहाच्या सुमारास ईडीचे अधिकारी नॅशनल हेराल्डच्या इमारतीत शिरले होते, अद्याप त्यांची छापेमारी सुरू आहे.

अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी दिल्लीतील काँग्रेसच्या मालकीच्या नॅशनल हेराल्ड वृत्तपत्राच्या कार्यालयासह १२ ठिकाणी ईडीने छापेमारी केली आहे. याशिवाय ईडीकडून कोलकाता येथील काही ठिकाणी छापे टाकण्याची शक्यता आहे.

नॅशनल हेराल्ड वृत्तपत्राशी संबंधित आर्थिक गैरव्यवहारप्रकरणात ईडीने गेल्या आठवड्यात (२७ जुलै) सोनिया गांधी यांची तीन तासांहून अधिक काळ चौकशी केली होती. ईडीकडून सोनिया गांधी यांना सातत्याने चौकशीसाठी बोलवण्यात येत असल्याने काँग्रेसने देशभर अनेक ठिकाणी आंदोलनं केली होती. तत्पूर्वी, ईडीने राहुल गांधी यांच्यासह काँग्रेस नेते पवन बन्सल आणि मल्लिकार्जुन खरगे यांचीदेखील चौकशी केली आहे. जून महिन्यात सलग पाच दिवस ईडीने राहुल गांधी यांना चौकशीसाठी बोलावलं होतं. दरम्यान, ईडीने त्यांची जवळपास ५० तास चौकशी केली.

Story img Loader