Bhupesh Baghel Son Chaitanya : छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचे पुत्र चैतन्य बघेल यांच्याविरोधात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मोठी कारवाई केली आहे. ईडीने बघेल कुटुंबाशी संबंधित राज्यातील १४ ठिकाणांवर छापेमारी केली आहे. प्रामुख्याने ही चैतन्य बघेल यांच्याविरोधातील कारवाई असल्याचं सांगितलं जात आहे. छत्तीसगडमधील कथित मद्य घोटाळ्याशी संबंधित पुरावे गोळा करण्यासाठी ही छापेमारी करण्यात आली आहे. छत्तीसगड सरकारच्या कथित मद्य घोटाळाप्रकरणात बघेल यांनी २०१९ ते २०२२ दरम्यान राज्याच्या तिजोरीमधील २,१६१ कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे.
ईडीने म्हटलं आहे की याप्रकरणी केलेल्या तपासादरम्यान असे काही धागेदोरे हाती लागले आहेत जे चैतन्य बघेल यांच्याशी जोडलेले आहेत. त्या पुराव्यांच्या आधारावर आज चैतन्य बघेल यांच्याशी संबंधित ठिकाणांवर छापेमारी करण्यात आली आहे. ईडीच्या तपासात वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी, राजकारणी व उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांचं एक सिंडिकेट असल्याचं उघड झालं आहे. या सिंडिकेटवर समांतर अबकारी प्रणाली संचालित केल्याचा आरोप आहे.
‘असा’ केला घोटाळा
या सिंडिकेटने योग्य कागदपत्रांशिवाय सरकारी दुकानांद्वारे बेहिशेबी मद्य विकून आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे. परिणामी छत्तीसगड सरकारच्या महसूल विभागाचं खूप मोठं नुकसान झालं आहे. या सिंडिकेटने सरकारच्याच महसुलावर डल्ला मारल्याचा आरोप आहे. बेकायदेशीर, बेहिशेबी मद्यविक्रीसाठी या सिंडिकेटने बनवाट होलोग्राम व बाटल्यांचा वापर केल्याचंही तपासांत आढळलं आहे.
(बातमी अपडेट होत आहे)