रायपूर : कोळसा शुल्क आकारणी गैरव्यवहारप्रकरणाच्या सुरू असलेल्या चौकशीचा भाग म्हणून सक्तवसुली संचालनालयाने (ईडी)ने सोमवारी छत्तीसगडमधील काँग्रेस नेत्यांची निवासस्थाने आणि कार्यालयांवर छापे टाकले.
भिलाईमध्ये काँग्रेस आमदार देवेंद्र यादव, प्रदेश काँग्रेसचे कोषाध्यक्ष रामगोपाल अग्रवाल, प्रवक्ते आर. पी. सिंह तसेच बांधकाम कामगार कल्याण मंडळाचे अध्यक्ष सुशील सनी यांच्याशी संबंधित ठिकाणी ईडीने छापे टाकले. अन्य काही पक्षांच्या नेत्यांवरही अशाच प्रकारची कारवाई करण्यात आली. या प्रकरणात आतापर्यंत नऊ जणांना अटकही करण्यात आली आहे. काँग्रेसने ‘ईडी’च्या या कारवाईवर टीका केली आहे. काँग्रेस नेत्यांच्या निवासस्थानी टाकलेले छापे हे राजकीय सूडाने प्रेरित असल्याचा आरोप मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी केला, तर अशा कारवायांना घाबरत नसल्याची प्रतिक्रिया काँग्रेसच्या नेत्यांनी व्यक्त केली.
रायपूरमध्ये येत्या शुक्रवारी काँग्रेसचे अधिवेशन सुरू होत आहे. तीन दिवस चालणाऱ्या या अधिवेशनात २०२४ च्या लोकसभा निवडणुकांच्या रणनीतीवर चर्चा होणार आहे. या अधिवेशनात व्यत्यय आणण्यासाठी ईडीमार्फत ही कारवाई करण्यात आल्याचा आरोप मुख्यमंत्री बघेल यांनी केला. भाजपला काँग्रेसची भीती वाटते. विरोधकांची मुस्कटदाबी करण्यासाठी केंद्रीय संस्थांचा गैरवापर होत आहे, असे ते म्हणाले.
गृहपाठ करूनच तपास यंत्रणांची कारवाई : सीतारामन
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काँग्रेसचे आरोप फेटाळले आहेत. काँग्रेसने भ्रष्टाचाराच्या मुद्दय़ावरून सत्ता गमावली, त्यांनी भ्रष्टाचारावर बोलू नये अशी टीका सीतारामन यांनी केली. तपास यंत्रणा गृहपाठ करून, सकृद्दर्शनी पुरावा आढळला तरच कारवाई करतात, असा दावाही त्यांनी केला.
प्रकरण काय?
कोळसा शुल्क आकारणीप्रकरणी झालेल्या कथित गैरव्यवहारांची चौकशी सुरू आहे. कोळशावर प्रतिटन २५ रुपये या दराने बेकायदा शुल्क वसूल करण्यात आल्याचा आरोप असून त्यांत वरिष्ठ अधिकारी, व्यावसायिक, राजकीय नेते आणि मध्यस्थही सामील असल्याचा संशय आहे.
ईडीच्या नऊ वर्षांतील ९५ टक्के कारवाया विरोधी पक्षांच्या- त्यातही बहुसंख्य काँग्रेस नेत्यांच्या विरोधातील आहेत. लोकशाही चिरडण्याच्या या प्रयत्नाचा आम्ही प्रतिकार करू.
– मल्लिकार्जुन खरगे, अध्यक्ष, काँग्रेस