दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन (satyendar jain) यांच्या अडचणीत वाढ होत आहे. सक्तवसुली संचालनालय (ED) ने मनी लाँडरिंग प्रकरणी जैन यांच्या घरावर आणि इतर संबंधित ठिकाणी छापे टाकले आहेत. याआधी सत्येंद्र जैन यांना ईडीने ३० मे रोजी याच प्रकरणी अटक केली आहे.

९ जूनपर्यंत ईडीची कोठडी

४ ऑगस्ट २०१७ रोजी दाखल झालेल्या गुन्ह्यात सत्येंद्र जैन यांनी हवालाद्वारे ४.८१ कोटी रुपये घेतल्याचा आरोप आहे. या प्रकरणी जैन यांना अटक करण्यात आली असून ९ जूनपर्यंत ईडीची कोठडी सुनावण्यात आली आहे. एप्रिलमध्ये, ईडीने जैन आणि त्यांच्या कुटुंबाची सुमारे ४.८१ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली होती. जैन यांच्या जवळच्या लोकांचे काही कंपन्यांशी संबंध असल्याचा आरोप ईडीने केला आहे. ज्यांची मनी लाँडरिंग कायद्यांतर्गत चौकशी सुरू आहे.

यापूर्वी एप्रिलमध्ये, ईडीने म्हटले होते की २०१५-१६ मध्ये जेव्हा सत्येंद्र कुमार जैन मंत्री होते तेव्हा त्यांच्या मालकीच्या आणि त्यांच्या नियंत्रणाखाली असलेल्या कंपन्या हवालाद्वारे शेल कंपन्यांकडून कोलकातास्थित एंट्री ऑपरेटरकडे हस्तांतरित करण्यात आल्या होत्या.

ईडीने खोट्या प्रकरणात अटक केल्याचा आरोप

जैन यांच्या अटकेनंतर दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी आरोग्यमंत्र्यांना ईडीने खोट्या प्रकरणात अटक केल्याचा आरोप केला होता. हिमाचल प्रदेश निवडणुकीसाठी ते आम आदमी पक्षाचे प्रभारी आहेत आणि भाजपला तेथे निवडणूक हरण्याची भीती असल्याने हे केले गेले असल्याचे त्यांनी सांगितले. त्याच वेळी, ईडी अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, ३० मे रोजी चौकशी केल्यानंतर, जैन यांना मनी लाँडरिंग कायद्याच्या कलमांतर्गत अटक करण्यात आली आहे. सत्येंद्र जैन हे केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली दिल्ली सरकारमध्ये आरोग्य, उद्योग, ऊर्जा, गृह, शहरी विकास आणि पाणी मंत्री आहेत.