नवी दिल्ली : झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या दिल्लीतील निवासस्थानी सोमवारी चौकशीसाठी गेलेल्या सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) अधिकाऱ्यांनी तिथे तब्बल १२ तास तळ ठोकला. कथित जमीन घोटाळा प्रकरणाशी संबंधित आर्थिक गैरव्यवहाराचा तपास करण्यासाठी हे अधिकारी सोरेन यांच्या चौकशीसाठी गेले आहेत. दरम्यान, ईडीच्या कारवाया ‘राजकीय हेतूंनी प्रेरित’ असल्याचा आरोप सोरेन यांनी रविवारी ईडीला पाठवलेल्या ईमेलमध्ये केला आहे.
मात्र, हेमंत सोरेन हे बेपत्ता असून त्यांच्याशी संपर्क होऊ शकत नसल्याचे ईडीच्या अधिकृत सूत्रांनी सांगितले, तर ते फरार झाल्याचा आरोप भाजपने केला. सोरेन यांच्या कुटुंबीयांनी हे आरोप फेटाळले असून त्यांची बदनामी करण्यासाठी त्यांच्याविरोधात खोट्या गोष्टी रचल्या जात आहेत असा आरोप त्यांनी केला.
हेही वाचा >>> न्यायाधीश, अधिकाऱ्यांना प्रशिक्षण द्या ! गुजरात उच्च न्यायालय, सरकारची सर्वोच्च न्यायालयाकडून कानउघाडणी
हेमंत सोरेन कुटुंबाच्या एका सदस्याने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर ‘पीटीआय’ला सांगितले की, ईडी आणि सोरेन यांच्यादरम्यान अनेकदा संभाषण झाले आहे. त्यानुसार, त्यांनी ३१ जानेवारीला रांची येथील निवासस्थानी दुपारी एक वाजता जबाब नोंदवण्यास तयार असल्याचे सांगितले आहे. यापूर्वी ईडीने २० जानेवारीला रांची येथील निवासस्थानी सोरेन यांची चौकशी केली होती. त्यावेळी त्यांना २९ जानेवारी किंवा ३१ जानेवारीला चौकशीसाठी उपस्थित राहण्यास सांगण्यात आले होते.
सोरेन हे रांचीहून २७ जानेवारीला दिल्लीला वैयक्तिक कामासाठी गेले असल्याचे सांगण्यात आले. मात्र, हेमंत सोरेन हे ईडीच्या कारवाईला घाबरून १८ तासांपासून फरार असल्याचा आरोप भाजपच्या झारखंडमधील नेत्यांनी केला आहे. या प्रकरणात झारखंड राज्याची विश्वासार्हता आणि प्रतिष्ठा पणाला लागली असून राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी त्याची दखल घ्यावी अशी विनंती केली.