पीटीआय, नवी दिल्ली/पाटणा
जमिनीच्या मोबदल्यात नोकरी घोटाळाप्रकरणी राष्ट्रीय जनता दल प्रमुख, माजी रेल्वेमंत्री व बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांच्या कुटुंबीयांशी कथितरित्या संबंधित मालमत्तांवर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) छापे टाकले. हे छापे बिहारमधील अनेक शहरे व राजधानी दिल्लीत टाकण्यात आले. लालूप्रसाद यांच्या तीन मुलींसह राष्ट्रीय जनता दलाच्या नेत्यांशी कथितरित्या संबंधित या मालमत्ता आहेत.
अधिकाऱ्यांनी सांगितले, की पाटणा, फुलवारी शरीफ, नवी दिल्ली, रांची आणि मुंबईतील लालूप्रसाद यांच्या कन्या रागिणी यादव, चंदा यादव, हेमा यादव व ‘राजद’चे माजी आमदार अबू दोजाना यांच्याशी संबंधित मालमत्तांवर हे छापे टाकले आहेत. हे प्रकरण २००४ ते २००९ दरम्यान लालूप्रसाद रेल्वेमंत्री असतानाच्या काळातील आहे. या प्रकरणी लालूप्रसाद यांच्या कुटुंबाला जमिनी भेटीदाखल किंवा विक्री करून त्याच्या मोबदल्यात अनेकांना रेल्वेमध्ये नोकऱ्या दिल्याच्या आरोप आहे. केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) लालूप्रसाद, त्यांची पत्नी व बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडीदेवी व अन्य १४ जणांविरुद्ध गुन्हेगारी कट, आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्याच्या (पीएमएलए) तरतुदींखाली आरोपपत्र दाखल केले आहे. सर्व आरोपींना १५ मार्च रोजी चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे ‘समन्स’ बजावले आहे. पीएमएलए’ कायद्याच्या फौजदारी कलमांतर्गत नोंदवलेल्या ‘सीबीआय’च्या तक्रारीवरून ‘ईडी’ने ही कारवाई केली आहे.
या प्रकरणी ‘सीबीआय’ने नुकतीच लालूप्रसाद व त्यांच्या पत्नी राबडीदेवींची चौकशी केली होती.