पीटीआय, नवी दिल्ली

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) शनिवारी राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यांचे कुटुंबीय, तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या कन्या के. कविता आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांच्याविरोधात कारवाई केली. छापेमारी आणि चौकशी असे या कारवाईचे स्वरूप होते.
रेल्वेत ‘नोकरीच्या बदल्यात जमीन’प्रकरणी माजी रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादव यांच्या कुटुंबीयांच्या मालमत्तांवर छापे टाकण्यात आले, तर दिल्ली अबकारी धोरणातील कथित गैरव्यवहारप्रकरणी ‘भारत राष्ट्र समितीच्या (बीआरएस) नेत्या आमदार के. कविता यांची चौकशी करण्यात आली आणि आर्थिक अपहारप्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार तसेच माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या कागल (कोल्हापूर) येथील निवासस्थानी तिसऱ्यांदा छापेमारी करण्यात आली.

लालूप्रसाद यादव यांच्या कुटुंबीयांशी संबंधित एकंदर २४ ठिकाणी छापे टाकण्यात आले. त्यांत एक कोटी रुपयांची बेहिशेबी रोकड, १९०० अमेरिकी चलन, ५४० ग्रॅम सोन्याची बिस्कीटे आणि दीड किलो सोन्याचे दागिने असा सुमारे ६०० कोटी मूल्याचा ऐवज जप्त करण्यात आल्याची माहिती ईडीने ट्वीट संदेशाद्वारे दिली.

के. कविता यांची शनिवारी चौकशी करण्यात आली. कविता सकाळी ११ वाजता ईडी कार्यालयात हजर झाल्या. दिल्ली अबकारी धोरणातील कथित गैरव्यवहारप्रकरणी कविता यांना गुरुवारी चौकशीसाठी बोलावले होते. मात्र, त्यांनी शुक्रवारी दिल्लीमध्ये महिला आरक्षण विधेयकाच्या मुद्दय़ावर दिवसभर धरणे आंदोलन केले. त्यामुळे त्यांनी नंतरची वेळ मागून घेतली होती. अरुण रामचंद्र पिल्लई या हैदराबादमधील व्यावसायिकाला काही दिवसांपूर्वी ईडीने अटक केली आहे. कविता आणि पिल्लई या दोघांची एकत्रितपणे चौकशी करण्यासाठी के. कविता यांना बोलावण्यात आले होते.
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते मुश्रीफ यांच्या कागल येथील निवासस्थानी शनिवारी सकाळी ‘ईडी’ने पुन्हा छापा टाकला आहे. त्यांच्या पुण्यातील मालमत्तेची शुक्रवारी चौकशी करण्यात आली होती. शनिवारी त्यांच्या कागल येथील घरावर छापा टाकण्यात आला. गेल्या दोन महिन्यांत मुश्रीफ यांच्या घरांवर तीनदा छापे टाकण्यात आले. भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी मुश्रीफ यांच्यावर आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप केले आहेत. यापूर्वी मुश्रीफ यांची प्राप्तिकर, ईडी, सीबीआय आणि सहकार मंत्रालयानेही चौकशी केली आहे. याशिवाय मुश्रीफ अध्यक्ष असलेल्या कोल्हापूर जिल्हा बँकेचीही ‘ईडी’कडून चौकशी सुरू आहे.

दिवसभरात काय घडले?
’ राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांच्या कुटुंबीयांशी संबंधित मालमत्तांवर छापे, सुमारे ६०० कोटींचा ऐवज जप्त. बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांना चौकशीसाठी पाचारण.

’राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्या कागल (कोल्हापूर) येथील निवासस्थानी तिसऱ्यांदा छापा. ‘ईडी’च्या विरोधात कार्यकर्त्यांचे आंदोलन.

’‘बीआरएस’च्या नेत्या आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री केएसआर यांच्या कन्या के. कविता यांची दिवसभर चौकशी. ‘बीआरएस’च्या कार्यकर्त्यांची ‘ईडी’विरोधात निदर्शने, दिल्ली पोलीस आणि केंद्रीय निमलष्करी दलाचा बंदोबस्त.