जमिनीच्या बदल्यात नोकरी दिल्याबद्दल अंमलबजावणी संचालनालय ( ईडी ) राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा यांच्या लालू प्रसाद आणि त्यांच्या कुटुंबियांची चौकशी करत आहे. त्याच पार्श्वभूमीवर ईडीने २४ ठिकाणी धाडी टाकल्या. या धाडीत ईडीने ७० लाख रूपयांची रक्कम, दीड किलो तोळे सोन्याचे दागिने आणि परकीय चलन जप्त केलं आहे.
शुक्रवारी ईडीने पाटणा, रांची, मुंबई, बिहार आणि दिल्लीसह २४ ठिकाणी धाडी टाकल्या. यामध्ये लालू प्रसाद यादव यांच्या तीन मुली रागिनी, चंदा, हेमा यादव आणि तेजस्वी यादव यांच्या घरांचा समावेश आहे. तसेच, लालू प्रसाद यादव यांच्या जवळील समजले जाणारे राजदचे आमदार अबू दोजाना यांच्याही घरी ईडीने छापेमारी केली.
हेही वाचा : अमेरिकेने बंदी घातलेली ‘ती’ बँक आता एलॉन मस्क घेणार विकत! ट्विटरवरून दिले संकेत
या छापेमारीत ईडीला ७० लाख रुपयांची रक्कम, दीड किलो सोन्याचे दागिने आणि ५४० ग्रॅम सोनं तसेच, ९०० डॉलरचे परकीय चलन आढळले. ही रक्कम आणि सोन्याचे दागिने ईडीने तेजस्वी यादव आणि त्यांच्या बहीणींच्या घरातून जप्त केल्याचं ईडीने सांगितलं.
“एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन भाजपा आमच्याशी…”
दरम्यान, ईडी चौकशीवरून लालू प्रसाद यादव यांनी भाजपावर घणाघात केला. ट्वीट करत लालू प्रसाद यादव म्हणाले, “आम्ही आणीबाणीचा काळ पाहिला आहे. ती लढाई आम्ही लढलो आहोत. बिनबुडाच्या आणि बदल्याच्या भावनेतून सुरु असलेल्या कारवाईत माझ्या मुली, नातंवंड आणि गर्भवती सून यांना ईडीने तब्बल १५ तास बसवलं. एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन भाजपा आमच्याशी राजकीय लढाई लढणार का?”, असा सवाल लालू प्रसाद यादव यांनी केला.