दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांच्यावर ईडीनं सोमवारी अर्थात ६ जून रोजी धाड टाकली. सत्येंद्र जैन आणि त्यांच्याशी संबंधित एकूण ७ ठिकाणी ईडीनं धाड टाकली होती. दिवसभर चाललेल्या या धाडीमध्ये सत्येंद्र जैन यांच्याशी संबंधित अनेक गोष्टी ईडीनं ताब्यात घेतल्या. त्यामध्ये नेमकं काय काय तप्त केलंय, याची माहिती आता समोर आली आहे. या माहितीवरून ईडीला या कारवाईतून हाती मोठं घबाड लागल्याचं स्पष्ट झालं आहे. एएनआयनं यासंदर्भात माहिती दिली असून संबंधित आकडेवारी देखील दिली आहे.
एएनआयनं दिलेल्या आकडेवारीनुसार ईडीला या कारवाईत तब्बल २ कोटी ८२ लाख रुपयांची रोकड सापडली आहे. त्यासोबतच एकूण १३३ सोन्याची नाणी देखील ईडीनं हस्तगत केली आहेत. या नाण्यांचं एकूण वजन हे १ किलो ८०० ग्रॅम इतकं आहे. यामध्ये प्रकाश ज्वेलर्सवर टाकेलेल्या छाप्यात २ कोटी २३ लाख तर वैभव जैन नामक व्यक्तीकडे ४१ लाख ५ हजार रोख मिळाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच, वैभव जैन यांच्याकडेच १३३ सोन्याची नाणी सापडली आहेत.
नेमकं काय आहे प्रकरण?
सत्येंद्र जैन यांना ३० मे रोजी ईडीकडून अटक करण्यात आली आहे. ४ ऑगस्ट २०१७ रोजी दाखल झालेल्या गुन्ह्यात सत्येंद्र जैन यांनी हवालाद्वारे ४.८१ कोटी रुपये घेतल्याचा आरोप आहे. या प्रकरणी जैन यांना अटक करण्यात आली असून ९ जूनपर्यंत ईडीची कोठडी सुनावण्यात आली आहे. एप्रिलमध्ये, ईडीने जैन आणि त्यांच्या कुटुंबाची सुमारे ४.८१ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली होती. जैन यांच्या जवळच्या लोकांचे काही कंपन्यांशी संबंध असल्याचा आरोप ईडीने केला आहे. त्यांची देखील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी चौकशी सुरू आहे.
‘आप’चे मंत्री सत्येंद्र जैन यांच्या घरावर ई़डीचा छापा
अरविंद केजरीवाल यांची आगपाखड
दरम्यान, ईडीच्या कारवाईनंतर आपचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाजपा आणि केंद्र सरकारवर आगपाखड केली आहे. “या क्षणी पंतप्रधान पूर्ण ताकदीनिशी आम आदमी पक्षाच्या मागे लागले आहेत. विशेषत: दिल्ली आणि पंजाब सरकारच्या मागे. तुमच्याकडे सर्व यंत्रणांची ताकद आहे, पण ईश्वर आमच्यासोबत आहे”, अशी प्रतिक्रिया केजरीवाल यांनी दिली आहे.