काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि वायनाडचे खासदार राहुल गांधी यांना ईडीनं नॅशनल हेराल्ड आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी समन्स बजावले आहेत. सोनिया गांधींना ८ जून रोजी चौकशीसाठी पाचारण करण्यात आलं असून राहुल गांधी यांना २ जून रोजी बोलावण्यात आलं होतं. मात्र, राहुल गांधींनी चौकशीसाठी पुढची तारीख मिळावी, अशी विनंती केल्यानंतर ईडीनं ही तारीख आता बदलली आहे. आता राहुल गांधींना चौकशीसाठी १० दिवस नंतरची तारीख देण्यात आली आहे. सध्या राहुल गांधी परदेश दौऱ्यावर असल्यामुळे त्यांनी तारीख बदलून देण्याची विनंती ईडीला केली होती असं एनडीटीव्हीनं दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे.
१३ जूनला हजर होण्याचे आदेश
ईडीकडून राहुल गांधींना बजावण्यात आलेल्या नोटिशीमध्ये चौकशीची तारीख बदलून नव्याने नोटीस बजावण्यात आली आहे. आता राहुल गांधींना १३ जून रोजी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. एकीकडे राहुल गांधींच्या चौकशीची तारीख पुढे ढकलण्यात आली असताना दुसरीकडे सोनिया गांधींच्या चौकशीविषयी देखील संभ्रम निर्माण झाला आहे.
सोनिया गांधी करोना पॉझिटिव्ह, चौकशी कधी होणार?
बुधवारी रात्री काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची चाचणी केली असता त्या करोना पॉझिटिव्ह असल्याचं स्पष्ट झालं आहे. या पार्श्वभूमीवर सोनिया गांधी स्वत:हून विलगीकृत झाल्या आहेत. सोनिया गांधी अजूनही चौकशीसाठी जाणार नसल्याचं काँग्रेसकडून सांगण्यात आलेलं नाही. ईडीनं बजावलेल्या नोटिशीनुसार त्या तारखेच्या आधी पुन्हा एकदा करोना चाचणी केल्यानंतरच सोनिया गांधी चौकशीसाठी जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
इतर नेत्यांवरही आरोप
नॅशनल हेराल्ड प्रकरणात सुब्रह्मण्यम स्वामी यांनी सोनिया गांधी, राहुल गांधी, दिवंगत नेते मोतीलाल व्होरा, पत्रकार सुमन दुबे आणि टेक्नोक्रॅट सॅम पित्रोदा यांच्यावर आरोप केले होते. या प्रकरणाचा तपास ईडीने २०१४ मध्ये सुरू केला होता. यंग इंडिया लिमिटेडचा उद्देश नफा कमावणे हा नसून त्याची चॅरिटीसाठी स्थापन करण्यात आली आहे, असं काँग्रेसकडून सातत्याने सांगितलं जात आहे.