लालू प्रसाद यादव यांच्या कन्या राज्यसभेच्या खासदार मीसा भारती यांना आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) आज समन्स बजावले. यापूर्वी दोनच दिवसांपूर्वी मीसा आणि त्यांच्या पतीच्या मालकीच्या दिल्ली येथील तीन मालमत्तांवर ईडीने छापे टाकले होते.

ईडीच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी उच्चभ्रू भागात असणाऱ्या तीन फार्म हाऊसवर छापे टाकले होते. या छाप्यात काही महत्वाची कागदपत्रे आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू जप्त करण्यात आल्या होत्या. हे तीनही फार्महाऊस भारती यांच्यासह त्यांचे पती शैलेशकुमार आणि त्यांची कंपनी मेसर्स मिशेल पॅकर्स अॅण्ड प्रिन्टर्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्या मालकीचे आहेत. त्याचबरोबर या दाम्पत्याच्या इतर दोन मालमत्ताही ईडीने शोधून काढल्या असून लवकरच त्यांची सुद्धा चौकशी होण्याची शक्यता आहे.

सुरेंद्र जैन आणि विरेंद्र जैन या दोन मार्केट एंट्री ऑपरेटर्सना बनावट कंपन्यांच्या मार्फत ८ हजार कोटी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी मार्च महिन्यांत ईडीने अटक केली होती. या दोघांशी संबंध असल्याप्रकरणी ईडीने आज भारतींच्या मालमत्तांवर कारवाई केली आहे.

Story img Loader