स्वित्र्झलडच्या एचएसबीसी बँकेकडून मिळवलेल्या भारतीय खातेदारांच्या यादीतील संशयित व्यक्तींविरुद्ध सक्तवसुली संचालनालयाने चौकशीचा फास आवळण्यास सुरुवात केली आहे.

स्वित्र्झलडच्या एचएसबीसी बँकेतील एका कर्मचाऱ्याने ही यादी चोरली असल्याचे सांगितले जाते. त्यात ६२८ भारतीय खातेदारांची नावे होती. त्यापैकी २०० जणांचा ठावठिकाणा लागू शकला नाही, तर उरलेल्या ४२८ जणांचा तपास केला जात आहे. या सर्व खात्यांमध्ये मिळून चार हजार ५०० कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. मात्र ही यादी चोरून मिळवल्याचे कारण देत स्वित्र्झलडच्या अधिकाऱ्यांनी भारतीय तपास अधिकाऱ्यांशी सहकार्य करण्याचे नाकारले, तर करारातील गुप्ततेच्या अटींमुळे ही माहिती उघड करता येत नसल्याची कर खात्याची भूमिका आहे. त्यामुळे तपास संस्था आता प्राप्तिकर खात्याने करचुकवेगिरीसाठी देशाच्या विविध न्यायालयांत दाखल केलेल्या प्रकरणांमधून या यादीतील लोकांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. अशा १४० प्रकरणांची माहिती आजवर तपास संस्थांना लागली असून त्यांच्याविरुद्ध हवाला आणि अन्य प्रकारे काळा पैसा चलनात आणल्याच्या प्रकरणांत तपास सुरू असून गुंतलेल्यांभोवती फास आवळण्यास सुरुवात झाली आहे.

Story img Loader