पश्चिम बंगालमधील शिक्षक घोटाळासंबधी सक्तवसुली संचालनालय (ईडी) ने बुधवारी केलेल्या छापेमारीमध्ये २० कोटी रुपये रोकड, सोन्याचे दागिने, सोन्याच्या विटा, संपत्तीसंदर्भातील करारपत्रे यासारख्या गोष्टी मंत्री पार्थ चटर्जी यांच्या निकटवर्तीय असणाऱ्या अर्पिता मुखर्जी यांच्या घरातून ताब्यात घेतल्या आहेत. कोलकात्याजवळच्या बेलघराई शहरातील घरावर केलेल्या छापेमारीमध्ये ही संपत्ती ईडीने जप्त केलीय. मागील आठवड्यामध्येच अर्पिता यांच्या डायमंड सिटी कॉम्पलेक्स येथील घरावरील छापेमारीमध्ये २० कोटी रोकड सापडली होती.

नक्की वाचा >> विश्लेषण : २० कोटींची रोख रक्कम ज्यांच्या घरात सापडली त्या अर्पिता मुखर्जी आहेत तरी कोण?

मोठ्या प्रमाणात सापडलेल्या रकमेचा पंचनामा करण्यासाठी चार नोटा मोजण्याच्या मशिन्स मागवल्या. कोलकात्यामधील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मुख्यालयामधून या मशिन्स मागवण्यात आलेल्या. ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार घरामध्ये साडलेल्या सोन्याच्या विटांची किंमत ही दोन कोटींहून अधिक आहे. तपासामध्ये अधिक संपत्ती सापडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

एसएससी घोटाळा झाला तेव्हा सध्या ईडीने अटक केलेले मंत्री पार्थ चटर्जी शिक्षणमंत्री होते. याच चटर्जी यांच्या निकटवर्तीय मानल्या जाणाऱ्या अर्पिता मुखर्जी यांच्या डायमंड सिटी कॉम्पलेक्स येथील घरावर शुक्रवारी ईडीने धाड टाकली तेव्हा त्यांना ५०० आणि दोन हजाराच्या नोटांचा ढीग सापडला. ही रक्कम २० कोटी रुपये इतकी होती.

अशाच प्रकारची छापेमारी बुधवारी अर्पिता यांच्या अन्य एका घरी करण्यात आली असताना तिथेही असाच प्रकार आढळून आला. फक्त या छापेमारीमध्ये रोख रक्कमेबरोबरच सोनं आणि संपत्तीचे कागदपत्रंही आढळून आली. या नव्या छापेमारीनंतर भाजपाचे बंगालचे अध्यक्ष सुखांता मुजूमदार यांनी ट्विटरवरुन तृणमूल काँग्रेसवर निशाणा साधताना, “हे केवळ हिमनगाचं टोक आहे,” असं म्हटलंय.

नक्की वाचा >> विश्लेषण : मंत्र्याला अटक, निकटवर्तीयाच्या घरातून २० कोटी जप्त, पश्चिम बंगालमध्ये नेमका कसा झाला शिक्षक भरती घोटाळा?

रात्री सुरु झालेली ही छापेमारी सकाळी सव्वासातच्या सुमारास संपली आणि ईडीचे अधिकारी घराबाहेर पडले.

पाहा व्हिडीओ –

एएनआय या वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार या छापेमारीमध्ये एकूण २९ कोटींची संपत्ती जप्त करण्यात आली असून अर्पिता यांच्या घरांमधून जप्त केलेल्या संपत्तीचे मूल्य हे ४० कोटींहून अधिक आहे.

ममता बॅनर्जी यांच्या मंत्रिमंडळात सध्या पार्थ चटर्जी उद्योग आणि वाणिज्य मंत्री आहेत. ईडीने अटकेची कारवाई केल्यानंतरही ते राजीनामा देण्यास तयार नाहीत. या प्रकरणावरुन आता भाजपा आक्रमक झाल्याचं दिसत असून ममता बॅनर्जी यांच्यासाठी हे प्रकरण अडचणीचं ठरु शकतं असं म्हटलं जात आहे.

Story img Loader